'मला तू आवडतेस', वडगाव शेरीच्या कथित नगरसेवकाचे भाजीविक्रेत्या महिलेला फोन; महिलेची पोलिसात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 11:44 IST2024-12-13T11:44:18+5:302024-12-13T11:44:42+5:30
नगरसेवक बोलतोय म्हणत एका अनोळख्या व्यक्तीने महिलेला फोनवर फोन केले, शेवटी महिलेने त्रासाला कंटाळून पोलीस स्टेशन गाठले

'मला तू आवडतेस', वडगाव शेरीच्या कथित नगरसेवकाचे भाजीविक्रेत्या महिलेला फोन; महिलेची पोलिसात धाव
किरण शिंदे
पुणे: हॅलो, मी वडगाव शेरीचा नगरसेवक बोलतोय, असे म्हणत एका अनोळखी व्यक्तीने भाजीविक्रेत्या महिलेला फोनवर फोन केले. शेवटी ही महिला इतकी त्रासली की तिने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. आणि त्यानंतर संबंधित अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. चंदन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडलाय. ३० वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचे चंदन नगर परिसरात भाजी विक्रीचे शॉप आहे. ८ डिसेंबर ते १२ डिसेंबर या कालावधीत तिच्या मोबाईल क्रमांकावर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून वारंवार फोन आले. मला तू आवडतेस, मला तू पाहिजेस, बाकी काही बोलू नकोस, तू फक्त एस ऑर नो मध्येच बोल. मी वडगाव शेरीचा नगरसेवक बोलतोय. माझ्या आवडत्या व्यक्तीचा नंबर मी कसा पण काढू शकतो. यावर फिर्यादीने रॉंग नंबर आहे असे सांगितले असता मी मनपाचा नगरसेवक बोलतोय, उद्या येतोच तुझ्या भाजीच्या दुकानावर असे म्हणत फिर्यादीच्या स्त्री मनास लज्जा केली.
दरम्यान वारंवार अशा प्रकारे फोन करून त्रास देत असल्याने संबंधित महिलेने पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनीही अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला. सध्या तरी ही व्यक्ती कोणी नगरसेवक नसून डिलिव्हरी बॉय असल्याची माहिती समोर येते. चंदन नगर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास करत आहेत.