केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज (शुक्रवार) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी, जयराज स्पोर्ट्स् आणि कन्व्हेंशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात शिंदे यांनी भाषण केले. भाषण संपताना त्यांनी धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असा नारा दिला. शिंदे यांच्या 'जय गुजरात' घोषणेवरून आता राजकारण सुरू झाले आहे. दरम्यान, शिंदेंच्या या घोषणेसंदर्भात विचारले असता, "ते काय म्हणाले आणि काय नाही, यासंदर्भात आपल्याला काहीही माहीत नाही," असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.
अमित शाह यांच्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्रनंतर, जय गुजरात, असा नारा दिला, त्यावरून आता विविध स्वरुपाच्या प्रतिक्रिया येत आहेत? असे विचारले असता, अजित पवार यांनी, कुठल्या कार्यक्रमात? असा प्रश्न केला. यावर पत्रकार म्हणाले, पुण्यातल्या कार्यक्रमात. यावर पुन्हा अजित दादा म्हणाले, तसं नाही हो, पुण्यातल्या पहिल्या कार्यक्रमात केवळ अमित भाई शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच बोलले. आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री तेथे बोललो नाही. यानंतर आणखी दोन कार्यक्रम होते."
यावर पत्रकार म्हणाले, सिंधी समाजाचा कार्यक्रम होता. अजित दादा म्हणाले, सिंद्धी समाजाचा? नाही मला माहीत नाही, तो कार्यक्रम. मी नंतर निघूनच आलो ना. मी त्या कार्यक्रमाला नव्हतोच. त्यामुळे मला काहीच माहीत नाही, ते काय म्हणाले आणि काय नाही? मी असेपर्यंत तरी, तेथे तसे काही झाल्याचे मला आठवत नाही," असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुण्यात बरेच कार्यक्रम आहेत. मात्र कराडला एक लग्न असल्याने आपण त्यांना विचारून तेथे जात आहोत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत आहेत, असेही अजित पवार यांनी सांगितले.