माळेगावला चेअरमन झालो; आता पुढं सोमेश्वरलाही होणार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुगलीने इच्छुकांच्या पोटात गोळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 15:23 IST2025-09-28T15:22:47+5:302025-09-28T15:23:29+5:30
‘आम्हाला फार खाज होती; म्हणून ‘माळेगाव’ला चेअरमन झालो. आता पुढं ‘सोमेश्वर’लाही चेअमरन होणार आहे. सगळ्यांचे रेकॉर्डच मोडतो,’ अशी मिस्कील टिपणी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुगली टाकली.

माळेगावला चेअरमन झालो; आता पुढं सोमेश्वरलाही होणार;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुगलीने इच्छुकांच्या पोटात गोळा
सोमेश्वरनगर : ‘आम्हाला फार खाज होती; म्हणून ‘माळेगाव’ला चेअरमन झालो. आता पुढं ‘सोमेश्वर’लाही चेअमरन होणार आहे. सगळ्यांचे रेकॉर्डच मोडतो,’ अशी मिस्कील टिपणी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुगली टाकली. यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या संचालकांच्या पोटात गोळा आला. त्यानंतर थोड्याच वेळात ‘हे काही खरं नाही. ही गंमत होती. नाहीतर ज्याला चेअरमन व्हायचंय, त्याची झोप उडायची,’ असे स्पष्टीकरणही पवार यांनी दिले.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, माजी सभापती प्रमोद काकडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, सर्व संचालक यांच्यासह शेतकरी-सभासद उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, राज्यावर पुराचे अस्मानी संकट आहे. शेतीसह जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने २२०० कोटी रुपये मंजूर केले असून शेतकऱ्यांना तातडीची मदत दिली जात आहे. एकीकडे राज्यात, ओबीसी मराठा आणि इतर समाजांचा वाद असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमेश्वर येथे जातीय सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन केले. नीरा डाव्या कालव्याचे अस्तरीकरण सध्या सुरू आहे. मात्र पूर्ण कालव्याला अस्तरीकरण होणार नसून ज्या ठिकाणी भराव खचले आहेत, कालवा फुटण्याचा धोका आहे, त्याच ठिकाणी अस्तरीकरण होणार आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये. विहिरी पाझरायला लागल्या आहेत. सायफन कोणाचे आहेत हे मला माहिती आहे. तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे; त्यामुळे मी तुम्हाला सांभाळून घेत आहे. शेतीत एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, असे आवाहन पवार यांनी शेतकऱ्यांना केले. सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रास्ताविकात कारखान्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी आभार मानले.
‘सोमेश्वर’ची पूरग्रस्तांना मदत
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आणि संचालक मंडळांनी पूरग्रस्तांसाठी १५ लाख रुपयांची भरीव मदत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपुर्द केली. पूरग्रस्तांसाठी सर्वांनी मदत करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. उद्योजक आर. एन. शिंदे यांनी दोन लाख, पंकज निलाखे यांनी ५१ हजार आणि सैनिक संघटनेचे अध्यक्ष ताराचंद शेंडकर यांनी ११ हजार रुपयांची आर्थिक मदत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली.
नवीन चेहऱ्यांना संधी
येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी देण्याचे सूतोवाच अजित पवार यांनी केले. यामुळे इच्छुक तरुणांमध्ये उत्साह वाढला असून, निवडणुकीत नव्या चेहऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
सुप्रिया सुळे यांना टोला
अजित पवार यांनी यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. बारामतीतील तिरंगा चौकाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘काहीजण खूप लांबून कुणाकुणाला घेऊन येत होते. हे बरोबर आहे का? मी २५ ते ५० वर्षांचे नियोजन करून काम करतो. टीकाकार आता टीका करतात; पण नंतर माझे काम योग्य होते, असे म्हणतात.’