‘मी सूचना पेटी नाही’, हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज
By राजू इनामदार | Updated: March 24, 2025 18:57 IST2025-03-24T18:55:46+5:302025-03-24T18:57:49+5:30
‘तुम्हीच असे म्हणणार असाल, तर मग आमच्या तक्रारी सांगायच्या तरी कोणाला?’ असा कार्यकर्त्यांचा सवाल

‘मी सूचना पेटी नाही’, हर्षवर्धन सपकाळ वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज
पुणे : काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच शहर काँग्रेसची बैठक घेतली. त्यात काही कार्यकर्त्यांनी तक्रारीचा सूर लावताच त्यांनी ‘मी सूचना पेटी नाही, सगळे विसरा व पक्षासाठी काम करा,’ असे वक्तव्य केले. त्यामुळे काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. याला पक्षात खांदेपालट व्हावा, या मागणीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ‘तुम्हीच असे म्हणणार असाल, तर मग आमच्या तक्रारी सांगायच्या तरी कोणाला?’ असा कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे.
शहर काँग्रेसमध्ये बरीच गटबाजी आहे. त्याचे प्रदर्शन थेट पक्षाच्याच कार्यक्रमांमध्ये सातत्याने होत असते. लोकसभा, विधानसभा निवडणुकांनंतर व त्याआधीही शहराध्यक्ष बदलाबाबत काही नेते व पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मुंबई व्हाया थेट दिल्लीपर्यंत धडकले होते. मात्र, त्यांची मागणी मान्य झाली नाही. पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष पदात बदल केल्याने आता पुन्हा त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. किमान आता तरी आपले ऐकून घेतले जाईल, असे त्यांना वाटत होते. मात्र, नव्या प्रदेशाध्यक्षांनी आपली भेट त्या वळणावर जाणार नाही याची काळजी घेतलेली दिसून येते. त्यातच ‘मी सूचना पेटी नाही,’ या त्यांच्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
नेत्यापर्यंत आवाज पोहचतच नाही
माजी मुख्यमंत्री व पश्चिम महाराष्ट्राचे पक्षाचे प्रभारी पृथ्वीराज चव्हाण हे यावेळी उपस्थित होते. त्यांनीही ‘मतभेद मिटवा, एकत्र या’, असेच आवाहन केले. पक्षाचे नेते पक्षाच्या तळातील कार्यकर्त्यांकडे कधी पाहणार आहेत की नाही? त्यांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत की नाहीत? नेते आले की त्यांच्याभोवती स्थानिक नेत्यांचेच कोंडाळे असते. ते वरिष्ठांपर्यंत तळातील कार्यकर्त्यांचा आवाज पोहचूच देत नाहीत, असे यावर कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.