शिरूरमध्ये खळबळ! न्यायालयाच्या आवारात नवऱ्याने पत्नी व सासुवर झाडल्या गोळ्या; पत्नीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 15:27 IST2022-06-07T15:13:07+5:302022-06-07T15:27:28+5:30
गोळीबारात सासू गंभीर जखमी...

शिरूरमध्ये खळबळ! न्यायालयाच्या आवारात नवऱ्याने पत्नी व सासुवर झाडल्या गोळ्या; पत्नीचा मृत्यू
टाकळी हाजी (पुणे) : शिरूर न्यायालयाच्या परिसरात नवऱ्याने बायको व सासुला पिस्तुलातून गोळया झाडल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) घडली आहे. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून, सासू गंभीर जखमी झाली आहे.
या घटनेत मंजुळा दिपक ढवळे ( वय ३६, रा . वाडेगव्हाण ता. पारनेर) या गोळी लागून जागीच मृत्यु झाल्या आहेत. तर सासु तुळसाबाई रंगनाथ झावरे ( वय ५५ ) या जखमी झाल्या असून खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
याबाबत माहिती अशी की, झावरे व ढवळे कुटुंब शिरूर न्यायालयात पोटगी केसच्या संदर्भात आले होते. दिपक ढवळे व मंजुळा ढवळे या पती-पत्नीची केस न्यायालयात सुरु होती. ढवळे व झावरे कुंटुबात वाद होत शाब्दिक चकमक झाली.
न्यायालयात केसच्या सुनावनीसाठी आलेला दीपक ढवळे याने त्याचा भावाच्या मदतीने बायको व सासूवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. या गोळीबारात पत्नीचा मृत्यू झाला आहे. सासूवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ माजली आहे .
रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलिस ऊपनिरीक्षक देविदास कंरडे, शुभांगी कुटे, पो. अंमलदार ब्रम्हा पवार, संतोष औटी, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अभिजीत पवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नजिम पठाण, पोलिस अंमलदार राजेंद्र गोपाळे, प्रविण पिठले, संतोष सांळुंके यांनी दोनही आरोपींना पाठलाग करून तात्काळ ताब्यात घेतले आहे . पोलिस पुढील तपास करत आहेत.