पोटगीची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविल्याने पतीला एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा

By नम्रता फडणीस | Updated: June 7, 2025 19:28 IST2025-06-07T19:28:01+5:302025-06-07T19:28:31+5:30

पतीने जर दीड लाख रुपये पोटगीची रक्कम भरली तर त्याची शिक्षा कमी केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Husband sentenced to one month in prison for failing to pay alimony | पोटगीची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविल्याने पतीला एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा

पोटगीची रक्कम भरण्यास असमर्थता दर्शविल्याने पतीला एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा

पुणे : कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत पत्नीने पोटगीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर न्यायालयाने पोटगी मंजूर केली. मात्र, पत्नीस वर्षभर पोटगीची रक्कम न दिलेल्या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. मे २०२४ ते एप्रिल २०२५ पर्यंतची दीड लाख रुपये इतकी पोटगीची रक्कम न भरल्याप्रकरणी पतीला न्यायालयीन कोठडी देत एक महिना साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांनी हा आदेश दिला आहे.

पतीने जर दीड लाख रुपये पोटगीची रक्कम भरली तर त्याची शिक्षा कमी केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. स्मिता आणि राकेश (नावे बदललेली) यांचे अडीच वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना एक मूल देखील आहे. मात्र, कौटुंबिक हिंसाचारामध्ये पतीने नऊ महिन्यांच्या बाळासह पत्नीला घराबाहेर काढले. तिने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि पत्नीने ॲॅड. सचिन ताठे यांच्यामार्फत कौटुंबिक हिंसाचाराअंतर्गत केस दाखल करून पोटगीसाठी अर्ज केला. न्यायालयाने पत्नी व तिच्या मुलाला दरमहा २० हजार रुपये पोटगी मंजूर केली. मात्र, पतीने पोटगी वेळोवेळी भरली नाही. ती भरण्यास दिरंगाई केली. ही गोष्ट ॲॅड. ताठे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली असता न्यायालयाने पतीला किती पोटगीची रक्कम भरू शकतो, असे विचारले असता त्याने पोटगी भरण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे न्यायालयाने पतीला एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली.

Web Title: Husband sentenced to one month in prison for failing to pay alimony