थकीत पोटगी न भरल्याने पतीची महिन्याभरासाठी कारागृहात रवानगी
By नम्रता फडणीस | Updated: February 7, 2025 12:43 IST2025-02-07T12:42:53+5:302025-02-07T12:43:08+5:30
ही पोटगीची रक्कम ७ लाख ९५ हजार रुपये इतकी थकीत रक्कम होती

थकीत पोटगी न भरल्याने पतीची महिन्याभरासाठी कारागृहात रवानगी
पुणे :न्यायालयाने पत्नीला पोटगी देण्याचा आदेश दिला होता. मात्र, पतीने पोटगीची रक्कम न भरता न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. बडवे यांनी पतीची महिन्याभरासाठी कारागृहात रवानगी केली आहे.
पत्नीच्या वतीने ॲड. ऋतुराज पासलकर, ॲड. पुष्कर पाटील, ॲड. प्रतीक पाटील आणि ॲड. समर्थ हुंडेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. पत्नीने दि. ९ मार्च २०२१ रोजी कौटुंबिक हिंसाचाराबाबत न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयीन खटल्यामध्ये हजर न झाल्यामुळे पतीच्या विरोधात न्यायालयाने दि. २३ जुलै २०२३ रोजी एकतर्फी आदेश दिला होता. त्यानुसार न्यायालयाने पत्नीला १५ रुपये, तसेच मुलाला ५ हजार रुपये उदरनिर्वाह करता, तसेच घर भाड्यापोटी ५ हजार रुपये असे एकूण दरमहा २५ हजार रुपये भरण्याचे आदेश दिले होते. याशिवाय नुकसान भरपाई म्हणून ४० हजार, तसेच प्रस्तुत प्रकरणाच्या खर्चापोटी पाच हजार रुपये भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या आदेशानुसार पतीने पोटगीची रक्कम न भरली नाही.
ही पोटगीची रक्कम ७ लाख ९५ हजार रुपये इतकी थकीत रक्कम होती. त्या अनुषंगाने पत्नीने वकिलांमार्फत पीडब्ल्यूडीव्हीए एक्झिक्युशन दि. २२ ऑगस्ट २०२३ रोजी न्यायालयात दाखल केले होते. याबाबत पत्नीच्या वकिलांनी दि. ९ जानेवारीला न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १२५ (३) प्रमाणे पतीला सिव्हिल प्रिझनमध्ये घेण्याचा अर्ज केला होता. न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर करीत असल्याने पतीला न्यायालयीन कोठडीत घेण्यात यावे; तसेच पत्नी व मुलाची देखभाल करणे हे पतीचे प्रथम कर्तव्य आहे. त्यापासून पतीची सुटका होऊ शकत नाही असा युक्तिवाद पत्नीच्या वकिलांनी केला. त्यानुसार सर्व बाबी विचारात घेऊन न्यायालयाने पतीला एक महिना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने न्यायालयाने पतीला ताब्यात घेऊन येरवडा कारागृहात त्याची रवानगी केली आहे.
एखाद्या व्यक्तीला तुरुंगात पाठविणे ही समाधानाची पद्धत नसून, ही अंमलबजावणीची पद्धत आहे. तुरुंगात पाठविण्याचा संपूर्ण उद्देश म्हणजे जी व्यक्ती पुरेशा कारणाशिवाय आदेशाचे पालन करण्यास नकार देऊन, पोटगी देण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तीला, आदेशाचे पालन करण्यास आणि पोटगी भरण्यास बांधील करते. - ॲड. ऋतुराज पासलकर, पत्नीचे वकील