- किरण शेिंदे
पुणे : स्वतःच्या पत्नीचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून वेगवेगळ्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून बदनामी केल्याप्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 48 वर्षीय पत्नीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार गोव्यात राहणाऱ्या या महिलेच्या पतीविरोधात चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला ही पुण्यातील चंदन नगर परिसरात राहते तर तिचा पती गोव्यात राहतो. एप्रिल 2022 मध्ये या महिलेच्या पतीने फिर्यादीच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. त्यावर फोटो बदनामीकारक व मानहानीकारक मजकूर प्रसिद्ध केला. त्यानंतर वेगवेगळ्या लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या आणि अनोळखी लोकांना कॉल मी असा मेसेज पाठवत स्वतःच्या पत्नीची सामाजिक प्रतिमा मलीन केली. तसेच फिर्यादीच्या व्हाट्सअप वर अश्लील शब्द पाठवून त्यांना धमकी दिली आहे.
दरम्यान या सर्व प्रकारानंतर फिर्यादी महिलेने स्वतःच्याच पतिविरोधात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी झाल्यानंतर संबंधित पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चंदनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. चंदन नगर पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.