सासू-सुनेचे पटत नसल्याने पती-पत्नीचा पहिल्याच तारखेत घटस्फोट;परस्पर संमतीने केला होता अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 11:40 IST2024-12-17T11:40:21+5:302024-12-17T11:40:21+5:30

सुमारे सहा वर्षे वेगळे राहणाऱ्या जोडप्याला घटस्फोटानेच पूर्णविराम मिळाला.

Husband and wife divorced on the first date due to in-laws not agreeing; application was made with mutual consent | सासू-सुनेचे पटत नसल्याने पती-पत्नीचा पहिल्याच तारखेत घटस्फोट;परस्पर संमतीने केला होता अर्ज

सासू-सुनेचे पटत नसल्याने पती-पत्नीचा पहिल्याच तारखेत घटस्फोट;परस्पर संमतीने केला होता अर्ज

पुणे : सासू-सुनेचे पटत नव्हते, त्यातून पती-पत्नीच्या संसारात वादाला तोंड फुटले. सुमारे सहा वर्षे वेगळे राहणाऱ्या जोडप्याला घटस्फोटानेच पूर्णविराम मिळाला. २०१८ पासून विभक्त राहणाऱ्या दाम्पत्याचा घटस्फोट पहिल्या तारखेलाच मंजूर झाला. १५ ऑक्टोबर रोजी दाखल केलेला दावा १५ नोव्हेंबर रोजी मंजूर झाला. कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी.डी. पाटील यांनी हा निकाल दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय-निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे १८ महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्यांचा कालावधी वगळता येतो. या प्रकरणात दोघे सुमारे सहा वर्षे वेगळे राहत आहेत. त्यामुळे हा कालावधी वगळण्याची मागणी अर्जदार वकिलांनी केली. त्यानुसार न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

राकेश आणि स्मिता (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. पत्नीतर्फे ॲड. राणी कांबळे-सोनावणे, ॲड. ज्ञानदा कदम, ॲड. प्रियांका वाघ आणि ॲड. शीतल बडदे यांनी काम पाहिले, तर पतीतर्फे ॲड. कपिल दुसंगे यांनी काम पाहिले. अर्जदारांनी कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

दोघांचा विवाह पारंपरिक पद्धतीने पाहणी करून एप्रिल २०१६ झाला. तो नोकरी करतो, तर ती गृहिणी आहे. दोघांना एक मुलगी असून, ती आता ७ वर्षांची आहे. सासू-सुनेत वाद होऊ लागले. वाद विकोपाला गेल्यानंतर पत्नी मुलीला घेऊन २०१८ मध्ये माहेरी निघून गेली. त्यामुळे त्याने घटस्फोटासाठी २०१९ मध्ये एकतर्फी अर्ज केला. मात्र, तिला पुन्हा नांदायला आणायच्या अटीवर हा दावा काढून घेण्यात आला. त्यानंतर तिने २०२३ मध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा दाखल केला. त्यानंतर दोघे एकत्रित येणे शक्य नसल्याने दोघांनी वकिलामार्फत घटस्फोटासाठी परस्पर संमतीने अर्ज केला. तो मंजूर झाला आहे. निकालानुसार मुलगी पत्नीकडे राहणार आहे, तर त्याने तिला ५ लाख रुपये देऊन घटस्फोटाने नात्याला पूर्णविराम दिला आहे.

सहा वर्षांपासून होते वेगळे
कौटुंबिक वादातून दोघे ६ वर्षांपासून वेगळे राहत होते. दोघे आता एकत्र येणे शक्य नव्हते. परस्पर संमतीने दोघेही घटस्फोट घेण्यास तयार असल्याने दोघांना आणखी सहा महिने थांबविणे योग्य नव्हते. या निर्णयामुळे वेळेची बचत झाली आहे. दोघेही स्वतंत्र्यपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत. - ॲड. राणी कांबळे -सोनावणे, पत्नीच्या वकील 

Web Title: Husband and wife divorced on the first date due to in-laws not agreeing; application was made with mutual consent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.