भिगवण : पंढरपूरवरून देवदर्शन करून परतत असताना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण ग्रामपंचायत कार्यालयासमोर टँकरने पाठीमागून जोरदार ठोकर दिल्याने पतीचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
हा अपघात रविवारी (दि. ६) सकाळी १०च्या सुमारास घडला. यामध्ये मल्हारी बाजीराव पवार (वय ५७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान पत्नी पंखाबाई मल्हारी पवार (वय ५० दोघेही, रा.येळपणे पोलिसवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर) असे या दाम्पत्याचे नाव असून, पवार दाम्पत्य दुचाकीवरून (एमएच १६ एजी २३४३) घराकडे परतत असताना, अज्ञात टँकरने त्यांना धडक देऊन अपघात केला. यानंतर टँकर चालक फरार झाला. पवार दाम्पत्य हे पंढरपूरवरून देवदर्शन करून एकादशीच्या दिवशी गावी परतत असताना हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अपघातातील अज्ञात टँकरचा शोध घेण्याचे आणि गुन्हा दाखल करण्याचे काम भिगवण पोलिस करीत आहे.
पंढरपूर वरून येताना काळाचा घाला
आषाढी एकादशी निमित्ताने पवार दाम्पत्य पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनसाठी गेले होते. परत येत असताना पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण ग्रामपंचायत कार्यालयासमोर टँकरने धडक दिली. या घटनेत पतीचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देवदर्शन करून एकादशीच्या दिवशी गावी परतत असताना हा अपघात झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.