राजकीय पक्षाच्या नेत्यांनो लोकांच्या भावना का भडकावता; विकासाच्या कामांना महत्व द्या, अजित पवारांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 13:20 IST2022-04-17T13:16:15+5:302022-04-17T13:20:11+5:30
राज्यात, देशात जे प्रश्न आहेत त्याला आपण महत्त्व देऊ, ते कसे सोडवता येतील ते पाहू

राजकीय पक्षाच्या नेत्यांनो लोकांच्या भावना का भडकावता; विकासाच्या कामांना महत्व द्या, अजित पवारांचा सल्ला
बारामती : अरे बाबांनो, वेगवेगळ्या राजकिय पक्षाच्या नेत्यांनो आज आपल्या राज्यात, देशात जे प्रश्न आहेत त्याला आपण महत्त्व देऊ, ते कसे सोडवता येतील ते पाहू. हे का उगीच जुन्या कुठल्या विषयांमध्ये लोकांना घेऊन त्यांच्या भावना कशा भडकावता येतील, संभ्रामावस्ता कशी निर्माण करता येईल हे पाहण्याचं काम नाही, प्रसारमाध्यमांनी देखील आता हे कमी करावं, आणि विकासाच्या कामांना महत्त्व द्यावं, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले.
बारामती येथे रविवारी (दि. १७) विविध विकासकामांची पहाणी दौऱ्यावर असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले, दिल्लीमध्ये हनुमान जयंतीच्या मिरवणूकीमध्ये रात्री काही अपप्रकार घडले हे आपल्यासुद्धा पाहण्यात आले असतील. सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपआपले सण आनंदाने, उत्साहाने सहभागी झाले पाहिजे. एकोप्याने राहिले पाहिजे. जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असे वर्तन कोणाकडून होऊ नये. संविधानामुळेच आपला देश एकसंघ असल्याचे आपल्याला पहावयास मिळते. आज आजूबाजूच्या देशांची काय अवस्था आहे. असे असताना सुद्धा आपला एवढा मोठा खंडप्राय देश केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुरदृष्टीमुळे व संविधानामुळे एकसंघ राहिला आहे. जेम्स लेनने नुकत्याच केलेल्या विधानावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छेडले असता ते म्हणाले, मी याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. तुम्ही कारण नसताना माझ्या नावाने पावत्या फाडू नका. सध्याच्या विकासाच्या कामांना व राज्यासमोर, देशासमोर असणाºया प्रश्नांना महत्त्व द्या, असा सल्ला देखील दिला.