PMC: टाक्यांचा नेमका वापर किती? न वापरण्याची कारणे काय? अतिरिक्त आयुक्तांनी मागितला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 11:14 IST2025-03-21T11:12:17+5:302025-03-21T11:14:16+5:30
६५ पाण्याच्या टाक्यांपैकी केवळ एकाच टाकीचा वापर सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांंची चांगलीच धावाधाव

PMC: टाक्यांचा नेमका वापर किती? न वापरण्याची कारणे काय? अतिरिक्त आयुक्तांनी मागितला खुलासा
पुणे : समान पाणीपुरवठा योजनेतील काम पूर्ण झालेल्या ६५ पाण्याच्या टाक्यांपैकी केवळ एकाच टाकीचा वापर सुरू असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांंची चांगलीच धावाधाव आणि गोंधळ झाल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले. दरम्यान, योजनेतील किती टाक्यांचा खरोखर वापर सुरू आहे, काम पूर्ण होऊनही वापर न होण्याची कारणे काय आहेत, याबाबत खुलासा करण्याचे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहे.
पुणेकरांना उच्च दाबाने समान पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेकडून अडीच हजार कोटी खर्चाची समान पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आली आहे. योजनेच्या आराखड्यानुसार शहरात विविध ठिकाणी ८६ पाणी साठवण टाक्या, पाणी वितरणासाठी १२२४ किमी लांबीच्या जलवाहिन्या, १०१ किमी लांबीच्या पाणी साठवण टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या आणि २ लाख ३२ हजार २८८ पाणी मीटर, ७ नागरी सुविधा केंद्रे आणि ५ नवीन पम्पिंग स्टेशन आदी कामे केली जाणार आहेत. हे काम ३६ महिन्यांत म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, विविध प्रकारच्या अडचणींमुळे आणि कोरोना प्रादुर्भावामुळे दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. त्यामुळे या प्रकल्पाची कामे करण्यास आजवर चारवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.
आतापर्यंत ८६ पाणी साठवण टाक्यांपैकी ६५ टाक्यांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १० टाक्यांची कामे ५० टक्के पूर्ण झाली असून, ९ टाक्यांची कामे ५० टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे २० टक्क्यांच्या आसपास झाली आहेत. दोन टाक्यांना अद्याप जागा मिळण्याची प्रतीक्षा आहे. काम पूर्ण झालेल्या ६५ पैकी केवळ २२ टाक्यांचा वापर पाणीपुरवठ्याच्या कामासाठी सुरू आहे. उर्वरित ४३ टाक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या व वितरण करणाऱ्या वाहिन्या जोडलेल्या नाहीत. त्यामुळे या टाक्यांचा वापर होत नाही.
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाने जानेवारीमध्ये माहिती अधिकारात कामे पूर्ण झालेल्या टाक्यांपैकी केवळ कात्रज येथील सर्व्हे नं. १२७ येथीलच एकाच टाकीचा वापर सुरू असल्याचे उत्तर दिले होते. तेच प्रशासन एका महिन्याच्या अंतराने २२ टाक्यांचा वापर सुरू असल्याचे सांगत आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने गुरुवारी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पाणीपुरवठा विभागात चांगलीच खळबळ माजली. संबंधित माहिती अधिकारात काय माहिती मागवण्यात आली होती, काय माहिती देण्यात आली, हे तपासण्यासाठी अधिकाऱ्यांची धावाधाव सुरू असल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेतला. तसेच पाण्याच्या टाक्यांच्या वापरासंदर्भात खुलासा करण्याचे आदेश दिले.
समान पाणीपुरवठा योजनेचा आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला आहे. काम पूर्ण झालेल्या किती टाक्यांचा वापर सुरू आहे, इतर टाक्यांचा वापर का होत नाही, याच्या कारणासह खुलासा करण्यास सांगितले आहे. - पृथ्वीराज बी. पी., अतिरिक्त आयुक्त, महापालिका.