व्यावसायिक गॅस तुटवड्याने हॉटेल व्यवसाय अडचणीत; बिबवेवाडीत काळाबाजार, सिलेंडर ६ हजारांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:14 IST2026-03-12T13:14:27+5:302026-03-12T13:14:54+5:30
हॉटेल चालकांच्या मते, गॅस उपलब्ध नसल्याने हॉटेल बंद ठेवले तरी कामगारांचे वेतन, दुकानाचे भाडे, वीजबिल यांसारखे खर्च सुरूच राहतात

व्यावसायिक गॅस तुटवड्याने हॉटेल व्यवसाय अडचणीत; बिबवेवाडीत काळाबाजार, सिलेंडर ६ हजारांवर
बिबवेवाडी : व्यावसायिक गॅस सिलेंडरची विक्री अचानक बंद झाल्यामुळे शहरातील हॉटेल व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला आहे. विशेषतः दक्षिण पुणे परिसरातील अनेक लहान-मोठ्या हॉटेल चालकांना या तुटवड्याचा फटका बसत असून, सध्या गॅस सिलेंडर काळाबाजारात तब्बल ६ हजार रुपयांपर्यंत विकला जात असल्याची चर्चा आहे.
हॉटेल चालकांच्या मते, गॅस उपलब्ध नसल्याने व्यवसाय थांबवावा लागण्याची वेळ आली आहे. मात्र हॉटेल बंद ठेवले तरी कामगारांचे वेतन, दुकानाचे भाडे, वीजबिल यांसारखे खर्च सुरूच राहतात. त्यामुळे अनेकजण जास्त दर देऊनही गॅस मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
काही हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले की, “हॉटेल बंद ठेवले तर रोजचे खर्च भागवणे कठीण होते. ६ हजार रुपयांचा सिलेंडर परवडत नसला तरी किमान काही प्रमाणात व्यवसाय सुरू ठेवता येतो आणि खर्च भागवण्यासाठी थोडी मदत होते.” दरम्यान, व्यावसायिक गॅसची ही टंचाई गंभीर स्वरूपाची असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. दक्षिण पुण्यातील हजारो कुटुंबांची उपजीविका हॉटेल व्यवसायावर अवलंबून असून, ही परिस्थिती दीर्घकाळ टिकल्यास अनेकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी केली आहे.