वैकुंठ स्मशानभूमीत भयंकर घटना: अर्धवट जळलेल्या मानवी मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी खाल्ले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:34 IST2025-01-08T16:32:24+5:302025-01-08T17:34:01+5:30
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने या गंभीर घटनेला वाचा फुटली आहे.

वैकुंठ स्मशानभूमीत भयंकर घटना: अर्धवट जळलेल्या मानवी मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी खाल्ले
पुणे – शहरातील वैकुंठ स्मशानभूमीत बुधवारी सकाळी घडलेली एक घटना पुणेकरांना हादरवून टाकणारी ठरली आहे. स्मशानभूमीत अर्धवट जळलेल्या मानवी मृतदेहाचे तुकडे भटक्या कुत्र्यांनी पळवून खाल्ले असल्याचे उघडकीस आले आहे. या भयानक घटनेमुळे पुणे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
स्मशानभूमीत मानवी मृतदेह जाळण्याची जबाबदारी असलेल्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे मृतदेह पूर्ण जळत नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे अर्धवट जळलेले मृतदेह भटक्या कुत्र्यांसाठी सहज उपलब्ध होतात. बुधवारी या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने या गंभीर घटनेला वाचा फुटली आहे.
स्मशानभूमीत मृतदेह जळल्यानंतर देखरेख आणि सुरक्षिततेची योग्य व्यवस्था नसल्यामुळे भटक्या कुत्र्यांना प्रवेश मिळतो, असे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. मानवी मृतदेहाचा असा अपमान होणे ही अत्यंत निंदनीय बाब असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
या घटनेसाठी जबाबदार असलेल्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली जात असून महापालिकेने स्मशानभूमीच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.