मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; ब्रेक फेल झाल्याने सिमेंटचा ट्रक खांबाला धडकला, चालकाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 21:28 IST2025-12-17T21:03:23+5:302025-12-17T21:28:15+5:30
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर बुधवारी सायंकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने सिमेंटचे ...

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; ब्रेक फेल झाल्याने सिमेंटचा ट्रक खांबाला धडकला, चालकाचा जागीच मृत्यू
Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बुधवारी सायंकाळी एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने सिमेंटचे ब्लॉक घेऊन जाणाऱ्या एका भरधाव ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला. हा ट्रक खंडाळा बोरघाटातील अमृतांजन पुलाच्या सिमेंटच्या खांबाला जाऊन धडकला. या धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की, ट्रकचा चालक केबिनमध्ये अडकला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सिमेंटचे जड ब्लॉक घेऊन जाणारा ट्रक अमृतांजन पुलाच्या परिसरातून जात होता. यावेळी उतारावर ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाने ट्रकवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र वेग जास्त असल्याने नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलाच्या भक्कम सिमेंट पोलवर जाऊन आदळला.
अपघात इतका भयंकर होता की ट्रकच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. चालकाचे शरीर केबिनमध्ये अशा प्रकारे अडकले होते की त्याला बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. देवदूत यंत्रणा आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत छिन्न-विछिन्न झालेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. मृत चालकाची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे.
अपघातानंतर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर सिमेंटचे ब्लॉक आणि ट्रकचा ढिगारा साचल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल झाले. घटनेची माहिती मिळताच आयआरबीची आपत्कालीन टीम, खंडाळा पोलीस आणि अपघातग्रस्त मदत पथकाने क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला केले. सुमारे तासाभराच्या प्रयत्नांनंतर वाहतूक संथ गतीने पूर्ववत करण्यात आली.