पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 00:04 IST2025-10-29T00:03:59+5:302025-10-29T00:04:49+5:30
Pune Truck Accident: अपघात घडल्यानंतर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून या ट्रकने डिव्हायडरवरुन जाऊन दुसऱ्या दिशेकडील इतर तीन वाहनांना धडक दिली.

पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
पुणे: फरश्या घेऊन कात्रज चौकाकडून नवले पुलाच्या दिशेने निघालेल्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून विचित्र अपघात घडला. या अपघातात एकूण तीन वाहनांचे नुकसान झाले असून यात दोन वाहनचालक किरकोळ जखमी झाले आहेत. याबाबत प्रकाश कुमार बुधन महतो (वय:३९ वर्षे, रा. बावधन, मूळ: झारखंड) या जखमी वाहनचालकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
याप्रकरणी ट्रकचालक तौफिक इसरार अहमद (वय:३२ वर्षे, रा. उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास फरश्या घेऊन निघालेला ट्रक नवले पुलाखाली आला असता ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रेडिमिक्स डंपर वाहनाला तसेच दोन कारला जोराची धडक दिली.
या तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला केली. यातील ट्रकचालक आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार संतोष शेंडे हे करत आहेत.
ट्रकचालक झोपेत की ब्रेकफेल?
अपघात घडल्यानंतर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून या ट्रकने डिव्हायडरवरुन जाऊन दुसऱ्या दिशेकडील इतर तीन वाहनांना धडक दिली. यात स्पष्टपणे चुक दिसत असून अपघाता वेळी ट्रक चालक झोपेत होता की ट्रकचा ब्रेक फेल झाला होता, हे आता आरटीओकडून ट्रकची तपासणी झाल्यानंतरच समजणार आहे.