पाईट (खेड तालुका) : श्रीक्षेत्र कुंडेश्वर येथे देवदर्शनासाठी जात झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी असलेल्या सुलाबाई बाळासाहेब चोरघे (वय ५२) यांची बिर्ला हॉस्पिटल पुणे येथे उपचार घेत असताना प्राणज्योत मालवली. यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलांची संख्या ११ झाली असून अद्यापही १८ महिला वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागात दाखल आहे. श्रीक्षेत्र कुंडेश्वर या ठिकाणी देवदर्शन साठी जात असताना तिसऱ्या श्रावणी सोमवारी दिनांक ऑगस्ट ११ रोजी कुंडेश्वर डोंगराच्या पहिल्या वळणावर 40 महिलांना घेऊन जाणाऱ्या पिकअप गाडीचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये यापूर्वी दहा महिलांचा मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या तीस महिला वेगवेगळ्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत होत्या. त्यापैकी अकरा महिलांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली साधारण वार्ड मध्ये शिफ्ट केले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. तर १८ महिला अद्यापही अति दक्षता विभागात आहे. सुश्रुत हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या सुलाबाई चोरघे यांची प्रकृती गुंतागुंतीची होत असल्याने त्यांना पुणे येथील बिर्ला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. आज सायंकाळी चार वाजून तीस मिनिटांनी मृत्यूशी झुंज देत असलेल्या सुलाबाई बाळासाहेब चोरघे यांचि प्रांज्योत मलावली त्यामुळे मृतांची संख्या ११ झाली आहे. या मृत्यूने अपघात ग्रस्त कुटुंबीय सावरत असताना धक्का बसला असून ग्रामस्थ काळजीत पडले आहे.