सोशल मीडियावरच्या ‘त्या’ अफवेने येरवड्यासह पुणे शहरात उडाली एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 19:36 IST2020-03-30T19:35:45+5:302020-03-30T19:36:47+5:30

येरवड्यात कोरोनाचा फक्त "एकच" रुग्ण, सोशल मीडियावर अफवांचा धुमाकूळ...

The horrible condition is create due to one message of social media message erupted in Pune city | सोशल मीडियावरच्या ‘त्या’ अफवेने येरवड्यासह पुणे शहरात उडाली एकच खळबळ

सोशल मीडियावरच्या ‘त्या’ अफवेने येरवड्यासह पुणे शहरात उडाली एकच खळबळ

ठळक मुद्दे सध्या"त्या" रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर

पुणे :   येरवड्यात कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती रविवारी रात्री समजल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले . त्यानंतर सोशल मीडियावर सोमवारी ( दि.३०) सकाळपासून येरवड्यात कोरोनाचे १७ पॉझिटिव्ह रुग्ण अशी अफवा मोठ्या प्रमाणावर वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे येरवड्यासह पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

येरवडा परिसरातील सुमारे २० ते २५ लोकांची तपासणी करण्यात आली असून अद्याप इतर एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झाली नसल्याची माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली. त्यापूर्वी लक्ष्मीनगर येरवडा येथील एका ज्येष्ठ नागरिकाला हृदयाची तपासणीसाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचवेळी त्याला सर्दी,ताप,खोकला अशी लक्षणे आढळून आल्यामुळे त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. रविवारी त्याला कोणाची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. सध्या"त्या" रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबांसह परिसरातील सुमारे वीस ते पंचवीस नागरिकांची देखील ताबडतोब नायडू रुग्णालयात तपासणी करण्यात आली. सुदैवाने अद्याप यातील एकाही रुग्णाला कोरोनाची  लागण झाली नसल्याची माहिती सहायक आरोग्य प्रमुख डॉ.संजीव वावरे यांनी दिली. येरवड्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याची माहिती समजताच "अफवांचे पेव फुटले" आहे. "सतरा  रुग्णांना कोरोनाचा प्रादूर्भाव झाला असून सर्वांनी खबरदारी घ्यावी" असा मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड करण्यात आला आहे. या चुकीच्या मेसेज मुळे येरवड्यासह  संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली असून हाच चुकिचा मेसेज इतर अनेक ग्रुपवर लोकांनी खात्री न करतापुढे फॉरवर्ड केला आहे. त्यामुळे नागरिकांची दिशाभूल होत असून मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण होत आहेत. 
 कोरोना आजाराच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात लाँकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पुणे शहरात देखील त्याची अंमलबजावणी पोलीस अतिशय कडक पद्धतीने करीत आहेत. मात्र येरवड्यातील दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टी परिसरात नागरिक अजूनही याबद्दल जागरूक नाहीत. वारंवार सूचना करून देखील नागरिक रस्त्यावरच दिसून येत आहेत. त्यातच येरवड्यात कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे आता मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येरवडा लक्ष्मीनगर व परिसरात नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे. मात्र नागरिक अजूनही या बाबतीत गंभीर नाहीत. आगामी काळात अशाप्रकारे अफवा पसरवणाऱ्या वर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.


 

Web Title: The horrible condition is create due to one message of social media message erupted in Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.