‘त्या’ अस्सल वाचकाचा पुरस्कार देऊन सन्मान !
By श्रीकिशन काळे | Updated: January 7, 2025 14:46 IST2025-01-07T14:44:11+5:302025-01-07T14:46:33+5:30
पुणे पुस्तक महोत्सवातील तिचा फोटो झालेला व्हायरल

‘त्या’ अस्सल वाचकाचा पुरस्कार देऊन सन्मान !
पुणे : ‘ती’ पुणे पुस्तक महोत्सवात कचरावेचकाचे काम करत होती. पण ती खुद्द एक अस्सल वाचक असल्याने ‘ती’ एका पुस्तकाच्या स्टॉलवर थांबली. ‘जग बदलणारा बापमाणूस’ तिच्यासमोर होता. तिने ते पुस्तक हातात घेतले. एका हातात कचऱ्याची पिशवी तर दुसऱ्या हातात पुस्तक, असे छायाचित्र नंतर खूप व्हायरल झाले. कचरा वेचणारी देखील वाचक आहे, हे पाहून अनेकांना कौतुक वाटलं. त्यामुळे त्या वाचक प्रीती मोहिते यांचा लेखक जगदीश ओहोळ यांनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मोटिवेशनल पद्धतीने लेखक जगदीश ओहोळ यांनी ‘जग बदलणारा बापमाणूस’ हे पुस्तक लिहिले. त्यांच्या पुस्तकाच्या स्टॉलवर ‘ती महिला थांबली होती. तेव्हा खुद्द लेखकानेच तिचा फोटो काढला. या पुस्तकाच्या ३० व्या आवृत्तीचे प्रकाशन गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यक कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्रा. नितीन तळपाडे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राजेंद्र कोंढरे, कामगार नेते महादेव वाघमारे व लेखक जगदीश ओहोळ यांच्या उपस्थितीत झाला. तेव्हा त्या वाचकाचा सन्मान केला.
विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गज मान्यवरांचा क्रांतीज्योती - क्रांतीसुर्य व बापमाणूस पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून पुरस्कारार्थीची निवड करण्यात आली होती. तसेच यावेळी कार्यक्रमाला वाचक श्रोतावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
पुणे पुस्तक महोत्सवामध्ये जग बदलणारा बापमाणूस पुस्तक खरेदीसाठी गेलेली व ते वाचताना क्लिक झालेला फोटो समाजमाध्यमावर व्हायरल झाला. त्यानंतर सबंध जगभर त्या फोटोमुळे चर्चा झाली. ती तरुणी प्रीती मोहिते हिस जगदीशब्द फाउंडेशनच्या वतीने 'विशेष वाचक' म्हणून रोख रकमेसह पुरस्कार दिला. तसेच यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनीही या तरुणीला पुस्तकं खरेदी व वाचनासाठी सहकार्य म्हणून पाच हजार रुपयांची रोख मदत दिली.