भररस्त्यात पेटवून घेतलेल्या व्यक्तीला गृहमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलिसांची मदत, पुण्यातील घटना
By नम्रता फडणीस | Updated: December 26, 2023 18:23 IST2023-12-26T18:23:30+5:302023-12-26T18:23:45+5:30
त्यावेळी पेटवून घेतलेल्या व्यक्तीला बंदोबस्तावरील पोलिसांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले....

भररस्त्यात पेटवून घेतलेल्या व्यक्तीला गृहमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलिसांची मदत, पुण्यातील घटना
पुणे : कौटुंबिक वादातून एकाने पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना येरवड्यातील लूप रोड परिसरात सोमवारी घडली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गोल्फ क्लब रस्त्याने जाणार होता. त्यावेळी पेटवून घेतलेल्या व्यक्तीला बंदोबस्तावरील पोलिसांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले.
बबलू माणिक गायकवाड (वय ४०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे गंभीर भाजलेल्याचे नाव आहे. येरवड्यातील लूप रोड परिसरात पीएमपी बस थांब्याजवळ एका व्यक्तीने पेटवून घेतल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला सोमवारी दुपारी मिळाली. त्याचवेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा तेथून जाणार होता. त्यामुळे येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पाेलिसांनी त्वरित गायकवाड यांना रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातून गायकवाड यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.