विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुटी; शैक्षणिक कामकाज सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 06:13 PM2020-03-14T18:13:22+5:302020-03-14T18:24:14+5:30

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पाऊल ; विद्यापीठ, महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना सुटी नाही

Holidays for university and college students; Begin the academic work | विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुटी; शैक्षणिक कामकाज सुरू 

विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुटी; शैक्षणिक कामकाज सुरू 

googlenewsNext
ठळक मुद्देमार्गदर्शक सूचनांची विद्यार्थ्यांमध्ये जागृती करून काटेकोर अंमलबजावणी करावी

पुणे : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील महाविद्यालयांना सुटी देण्याचा निर्णय घेतला असला तरी केवळ विद्यार्थ्यांना सुटी असणार आहे. महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्याचे काम सोडून विद्यापीठात व महाविद्यालयांमध्ये इतर सर्व शैक्षणिक कामे सुरू राहणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध विद्यापीठांचे कुलगुरू, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांची शनिवारी बैठक घेण्यात आली. यावेळी महाविद्यालये बंद ठेवण्याबरोबरच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची विद्यार्थ्यांमध्ये जागृती करून या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आवाहन म्हैसेकर यांनी यावेळी केले. बैठकीस राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, असोसिएशन आॅफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अध्यक्ष तथा भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षण विभागाचे सहसंचालक मोहन खताळ, उपायुक्त प्रताप जाधव आदी उपस्थित होते. 
 चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशांचा प्रवास करून आलेल्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन (विलगीकरण) करावे. या विद्यार्थ्यांनी स्वत:हून घरीच १५ दिवस स्वतंत्र राहावे, कुटुंबात किंवा समाजात मिसळू नये, असे नमूद करून डॉ. म्हैसेकर म्हणाले, की परदेशातून आलेल्या व वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाºयांच्या सल्ल्यानुसार विलगीकरण कक्ष स्थापन करावा. या कक्षातील विद्यार्थ्यांचा इतर विद्यार्थ्यांशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. परदेशातून प्रवास करून आलेल्या विद्यार्थ्यांची नावे प्रशासनाला सादर करावी, असेही म्हैसेकर यांनी सांगितले.
---------------------
कोरोनाचा फैलाव वाढू नये; या उद्देशाने महाविद्यालयातील अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाविद्यालयांना सुटी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी घराबाहेर पडू नये. घरीच बसून अभ्यास करणे अपेक्षित आहे. मात्र, विद्यापीठ महाविद्यालयातील प्राध्यापक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुटी दिलेली नाही. त्यांनी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत इतर शैक्षणिक कामे करावीत. परीक्षांच्या वेळापत्रकात सध्या कोणताही बदल केलेला परीक्षा नियोजित वेळापत्रकात होणार आहेत.- डॉ. मोहन खताळ, पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक. 

Web Title: Holidays for university and college students; Begin the academic work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.