पुण्यातील ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराचा ऐतिहासिक निर्णय; मूर्तीवरील शेंदूर कवचाची दुरुस्ती होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 15:46 IST2025-12-10T15:45:20+5:302025-12-10T15:46:29+5:30
गेल्या काही दिवसांपासून पुरातन स्वयंभू श्रींच्या मूर्तीवरील शेंदूर कवच गळून पडत असल्याचे निदर्शनास आले होते

पुण्यातील ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिराचा ऐतिहासिक निर्णय; मूर्तीवरील शेंदूर कवचाची दुरुस्ती होणार
पुणे : पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपती मंदिरात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरातील मुख्य स्वयंभू गणेश मूर्तीवरील शेंदूर मिश्रित कवचाच्या दुरुस्ती प्रक्रियेला सोमवार, १५ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेमुळे मंदिर काही काळासाठी भाविकांसाठी पूर्णतः बंद राहणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टने दिली आहे.
मंदिराच्या उपलब्ध इतिहासात पहिल्यांदाच अशी शेंदूर कवच दुरुस्ती प्रक्रिया राबवली जात असून, ही अत्यंत संवेदनशील व जपून करण्याची बाब असल्याचे देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विनायक बाजीराव ठकार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून पुरातन स्वयंभू श्रींच्या मूर्तीवरील शेंदूर कवच गळून पडत असल्याचे निदर्शनास आले होते. नवसाला पावणारे आराध्यदैवत असल्याने भविष्यात कोणताही अपाय किंवा धोका उद्भवू नये, यासाठी विद्यमान कवच काढून दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे.
या प्रक्रियेसाठी मूर्तीतज्ञ, धार्मिक क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच पुरातत्व खात्याचे मार्गदर्शन घेण्यात आले आहे. संपूर्ण कामकाज विधीवत, शास्त्रोक्त आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली केले जाणार असून, ही दुरुस्ती विशेषतः श्रींच्या रोजच्या पूजेतील मुख्य मूर्तीवर होणार आहे. शेंदूर कवच काढणे व संबंधित अन्य आवश्यक कामे अत्यंत काळजीपूर्वक करावी लागणार असल्याने ही प्रक्रिया सुमारे तीन आठवडे चालण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्यक्ष कामाच्या गतीनुसार हा कालावधी कमी किंवा अधिक होऊ शकतो. कामकाजाचा आढावा घेऊन मंदिर शक्य तितक्या लवकर भाविकांसाठी खुले करण्याचा ट्रस्टचा प्रयत्न असल्याचेही सांगण्यात आले.
पुण्यातील अतिप्राचीन मंदिरांपैकी एक असलेल्या श्री कसबा गणपती मंदिराचा इतिहास इसवी सन १६१४ च्या सुमारास आढळतो. ‘जयति गजानन’ असा गौरव छत्रपती शिवाजी महाराजांनी केला असल्याचे उल्लेख इतिहासात आहेत. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यात अग्रस्थानी असलेले हे मंदिर आजही पुणेकरांच्या श्रद्धा आणि दैनंदिन जीवनाचे केंद्रबिंदू आहे.