संधिवाताच्या लक्षणांच्या आडून बळावतोय ‘हिमोफिलिया’, उशिरा निदान म्हणजे धोक्याची घंटा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:39 IST2025-10-28T11:39:10+5:302025-10-28T11:39:41+5:30
रुमॅटॉइड अथवा गॉट्स आर्थरायटिसप्रमाणेच हिमोफिलियामध्येही रक्त गोठण्याची प्रक्रिया बिघडते आणि त्वचेवर निळसर डाग दिसतात

संधिवाताच्या लक्षणांच्या आडून बळावतोय ‘हिमोफिलिया’, उशिरा निदान म्हणजे धोक्याची घंटा!
पुणे: सांधेदुखी, स्नायुदुखी आणि काळे-निळे डाग या लक्षणांना अनेकदा संधिवाताचे म्हणून उपचार केले जातात. मात्र, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, या लक्षणांच्या आड एक गंभीर आजार म्हणजे हिमोफिलिया लपलेला असू शकतो. रुमॅटॉइड अथवा गॉट्स आर्थरायटिसप्रमाणेच हिमोफिलियामध्येही रक्त गोठण्याची प्रक्रिया बिघडते आणि त्वचेवर निळसर डाग दिसतात. त्यामुळे चुकीच्या निदानामुळे रुग्णांना अनावश्यक त्रास सहन करावा लागतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
हिलोफिलिया हा रक्त गोठण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेशी संबंधित अनुवंशिक आजार आहे. शरीरात रक्त गोठवण्यासाठी लागणाऱ्या १२ घटकांपैकी आठवा आणि नववा घटक कमी पडल्यास हा आजार उद्भवतो. ‘व्हिटॅमिन के’ या जीवनसत्त्व समूहामधील घटकांमुळे जखमा बऱ्या होतात, मात्र त्यांची कमतरता असल्यास रक्तस्राव थांबवणे कठीण जाते. या आजाराचे प्रमाण महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक असून, गर्भवती मातेकडून बाळाकडे हा आजार वारसा म्हणूनही येऊ शकतो.
हिमोफिलियाग्रस्त रुग्णांना नियमितपणे ‘क्लॉटिंग फॅक्टर’चे इंजेक्शन दिले जाते, ज्याचा परिणाम फक्त १२ ते १८ तास टिकतो. रुग्णाच्या वजनानुसार हे इंजेक्शन २५० युनिट प्रति १० किलो वजन याप्रमाणे दिले जाते. महाराष्ट्रात सध्या सुमारे ५००० हून अधिक हिमोफिलिया रुग्ण उपचार घेत आहेत, असे समोर आले आहे. हिमोफिलिया सोसायटी ऑफ महाराष्ट्र पुणे विभागात सुमारे १२०० रुग्णांची नोंदणी झाली आहे.
संधिवात आणि हिमोफिलिया या दोन्ही आजारांतील साम्यामुळे अनेक रुग्णांना चुकीचे उपचार मिळतात. रक्ताची गुठळी होऊन सांध्यांमध्ये साठते आणि तिथे सूज व काळे-निळे डाग दिसतात. परिणामी, आजारावर नियंत्रण न मिळवता परिस्थिती अधिक गंभीर बनते. त्यामुळे कोणत्याही वयोगटातील पुरुषांमध्ये वारंवार सांधेदुखी आणि डाग पडणे अशी लक्षणे दिसल्यास “ हिमोफिलिया टेस्ट” करून घ्यावी. रक्त गोठण्याच्या प्रोफाइलच्या निदान चाचण्यांसाठी सक्षम प्रयोगशाळेत तपासणी करणे गरजेचे आहे. फॅक्टर इंजेक्शन आणि फिजिओथेरपीसह प्रोफिलॅक्सिस उपचारांचा मुख्य आधार असतो.
थंड किंवा पावसाळी वातावरणात वातप्रकोप वाढतो. अतिस्वल्प अत्यंत व्यायाम, जास्त चालणे किंवा उभे राहणे टाळावे. पोषक आहार आणि योग्य निदानाने या आजारावर नियंत्रण मिळवता येते. पुण्यातील काही रुग्णालयांमध्ये महात्मा जोतिबा फुले योजनेअंतर्गत उपचार उपलब्ध आहेत. हिमोफिलिया रुग्णांसाठी काम करणारी एनजीओ हिमोफिलिया सोसायटी ऑफ महाराष्ट्र पुणे चॅप्टर उपलब्धतेनुसार महागडे फॅक्टर इंजेक्शन मोफत अथवा सवलतीच्या दराने देते.- डॉ. सुनील लोहाडे, हिमोफिलिया तज्ज्ञ