मुसळधार पाऊस! पुण्यातील सिंहगड किल्ला गुरुवारी बंद, वनविभागाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 21:22 IST2025-05-27T21:21:57+5:302025-05-27T21:22:37+5:30

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गुरुवारी (दि. २९)रोजी सिंहगड किल्ला बंद ठेवण्यात येणार

Heavy rains! Sinhagad Fort in Pune closed on Thursday, Forest Department decision | मुसळधार पाऊस! पुण्यातील सिंहगड किल्ला गुरुवारी बंद, वनविभागाचा निर्णय

मुसळधार पाऊस! पुण्यातील सिंहगड किल्ला गुरुवारी बंद, वनविभागाचा निर्णय

पुणे : मॉन्सूनने केवळ २४ तासांमध्ये केरळमधून थेट राज्यात धडक दिली. त्यानंतरच्या २४ तासांमध्ये तळकोकणातील मुक्काम पुढे नेत मॉन्सून मुंबई पुण्यासह सोलापूरपर्यंत पोहोचला. येत्या तीन ते चार दिवसांत राज्यातील ८० टक्के भाग मॉन्सूनने व्यापला जाईल. पुढील ४८ तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता कश्यपी हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पावसाचा जोर इतका आहे की, ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तर शहरी भागातही रस्त्यांवरून नद्या वाहू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत घाट परिसरातही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पुण्यातील सिंहगड किल्ला गुरुवारी बंद ठेवण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे. 

जोरदार पावसाने घाट परिसरात धोका निर्माण झाला आहे. दरडी कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. सध्या पुणे शहर आणि घाट परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही अतिवृष्टी पुढील काही दिवस राहणार असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तसेच गुरुवारी (दि. २९) होणाऱ्या आपत्ती निवारणाच्या शासकीय पाहणी दौऱ्याच्या अनुषंगाने, सिंहगड किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली. यामध्ये ट्रेकिंगसाठी येणाऱ्या पर्यटकांनाही बंदी घालण्यात आली असून कल्याण दरवाजा, आतकरवाडी तसेच इतर सर्व पायी मार्गांनी प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आलेली आहे. नागरिकांनी सहकार्य करून प्रशासनास मदत करावी, असे आवाहनही उपवनसंरक्षकांनी केले आहे.

Web Title: Heavy rains! Sinhagad Fort in Pune closed on Thursday, Forest Department decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.