बारामती : गेल्या काही दिवसांत इंदापुर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी पावसाने शेतीसह सर्वसामान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात २५ ते ३० गावांत हे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र,पावसाचे हे नैसर्गिक संकट आहे. त्याला तोंड देण्यासाठी आपण सर्वांनी दक्ष राहण्याची गरज असल्याचे आवाहन क्रिडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
भरणे यांनी आज तालुक्यातील लाकडीसह विविध गावांचा दाैरा करीत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी भरणे म्हणाले, या पावसाने ओढ्या नाल्यासह नदीला पूर आला आहे. परिणामी शेतीसह, घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. सर्वसामान्य शेतकरी, नागरिक संकटात साापडला आहे. याबाबत कोणीही नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही. त्यासाठी तहसिलदार, गटविकास अधिकाऱ्यांसह महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत. नागरिक, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना देण्यात आले आहेत. रस्ते, बंधारे, वीजेच्या खांबांचे नुकसान झाले असल्यास आपल्या गावातील शासकीय कर्मचारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणा. त्यानंतरच सर्वांना मदत करणे शक्य होईल. सर्वांनी नुकसानीची कल्पना शासनाला देऊन सहकार्य करावे, नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला जाणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.