Heavy Rain Pune: पुण्यात येत्या ३-४ तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज
By श्रीकिशन काळे | Updated: May 8, 2023 14:53 IST2023-05-08T14:52:46+5:302023-05-08T14:53:05+5:30
पुणे शहरासह राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सातारा, धाराशिव (उस्मानाबाद), सिंधुदुर्ग येथेही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला

Heavy Rain Pune: पुण्यात येत्या ३-४ तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज
पुणे : पुणे शहरातील काही भागात रविवारी जोरदार पाऊस झाला. आज देखील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पुण्यातही रविवारी सायंकाळनंतर झालेल्या पावसामुळे पुणेकरांच्या सुट्टीची धांदल उडाली. पावसाचा जोर एवढा होता की, काही वेळातच रस्ते पाण्याखाली गेले. हडपसरमध्ये काल १३.५ मिमी एवढा पाऊस नोंदवला गेला. तर एनडीए १ मिमी, लोणावळा १, शिवाजीनगर ०.५, मगरपट्टा ०.५, हवेली ०.५ पावसाची नोंद झाली.
उन्हाळ्यात दुपारी प्रचंड उकाडा आणि सायंकाळी पाऊस हे समीकरण गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना अनुभवता येत आहे. हवामान बदलल्याचा हा फटका असल्याची चर्चा केली जात आहे. कारण पुण्याचे हवामान एवढे वाईट कधीच नव्हते, असेही हवामानशास्त्र अभ्यासकांचे म्हणणे आहे.
येत्या तीन-चार तासांमध्ये पुणे शहरासह राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी, अहमदनगर, सातारा, धाराशिव (उस्मानाबाद), सिंधुदुर्ग येथेही जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.