पुरंदर विमानतळ हरकतींवर सुनावणी आणखी आठवडाभर चालणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:41 IST2025-06-15T15:41:18+5:302025-06-15T15:41:56+5:30
प्रस्तावित विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे

पुरंदर विमानतळ हरकतींवर सुनावणी आणखी आठवडाभर चालणार
पुणे :पुरंदरविमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत सात गावांमधील शेतकऱ्यांनी घेतलेल्या हरकतींवर ९ जूनपासून सुनावणी सुरू आहे. यात काही शेतकरी अद्यापही विरोध करत असून, काही शेतकरी मात्र संमती असल्याची कल्पना प्रशासनाला देत आहेत. ही सुनावणी पुढील आठवड्यातही सुरू राहील. त्यानंतर प्रत्यक्ष मोजणीबाबत निर्णय होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
प्रस्तावित विमानतळासाठीपुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून सुमारे २ हजार ६७३ हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे या गावांतील शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर विमानतळासाठी जागा आरक्षित करण्यात आली असून, त्यावर शिक्के मारण्यात आले आहेत. त्यामुळे या जमिनीची आता खरेदी-विक्री होऊ शकणार नाही. त्यानुसार भूसंपादनासाठी ३२ (२) च्या नोटीस शेतकऱ्यांना देण्यात आल्या. या नोटीसनंतर हरकती नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून २९ मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. शेतकऱ्यांनी त्यावर २ हजार ५२ हरकती नोंदवल्या. त्याची सध्या सुनावणी सुरू आहे. भूसंपादनासाठी नियुक्त करण्यात आलेले डॉ. कल्याण पांढरे, वर्षा लांडगे तसेच संगीता चौगुले हे अधिकारी सुनावणी घेत आहेत. ही सुनावणी अजून अपूर्ण असून, पुढील आठवडाभर चालणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष जमीन मोजणीबाबत निर्णय होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या सुनावणीत काही शेतकरी अद्यापही संपादनाला विरोध करत असल्याचे चित्र आहे. कुठल्याही परिस्थितीत जमीन द्यायची नाही, अशीच त्यांची भूमिका आहे. अशा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, त्यासोबतच काही शेतकरी संमती असल्याचेही जिल्हा प्रशासनाला कळवत आहेत. भूसंपादनाबाबत मोबदला किती जाहीर होतो, त्यावर अनेक बाबी अवलंबून असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.