डॉ. प्रदीप कुरूलकर विरोधात आरोप निश्चितीसंदर्भातील सुनावणी १२ जानेवारीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:54 IST2025-12-22T17:53:19+5:302025-12-22T17:54:33+5:30
पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या प्रकरणात दोषारोपनिश्चितीनंतर खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा होणार

डॉ. प्रदीप कुरूलकर विरोधात आरोप निश्चितीसंदर्भातील सुनावणी १२ जानेवारीला
पुणे : पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली कारागृहात असलेला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) माजी संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरूलकरवर दोषारोप निश्चिती संदर्भातील सुनावणी दि. १२ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहोचेल, असे कृत्य कुरूलकर याने केले आहे. देशाची गोपनीय माहिती पाकिस्तानी हेराला पोहोचविली आहे. याबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार युक्तिवाद करणार आहेत. दोषारोपनिश्चितीनंतर खटल्याच्या सुनावणीचा मार्ग मोकळा होईल.
‘हनी ट्रॅप’मध्ये अडकून झारा दासगुप्ता या पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती दिल्याच्या आरोपावरून डॉ. प्रदीप कुरूलकर याला दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ४ मे २०२३ मध्ये अटक केली होती. कुरूलकर याच्या विरोधात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) २०२३ मध्येच दोन हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. त्यात कुरूलकर याने पाकिस्तानी हेरांना कशा पद्धतीने माहिती पाठवली, याबाबतचे आरोप ठेवण्यात आले आहेत. सध्या कुरूलकर हे कारागृहात आहेत. कुरूलकरने वकिलांमार्फत जामिनासाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे.
सोमवारी (दि. २२) लाडेकर कोर्ट या विशेष न्यायालयात कुरूलकर याच्या विरोधात दोषारोपनिश्चितीसंदर्भात प्राथमिक सुनावणी झाली. न्यायालयाने विशेष सरकारी वकिलांना प्रथम दोषारोपनिश्चितीबाबत युक्तिवाद करण्यासाठी १२ जानेवारी तारीख दिली आहे. त्यांच्या युक्तिवादानंतर कुरूलकर यांचे वकील ॲड. ऋषिकेश गानू आपले म्हणणे सादर करतील.