'मॅडम बोल रही है वही गाना रातभर बजाओ', असे म्हणत पबमधील पार्टीत तरूणीचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 16:20 IST2021-11-29T16:20:31+5:302021-11-29T16:20:42+5:30
मित्रांसोबत पार्टीमध्ये डान्स करत असताना तरुणीने डिजेला गाणे बदलण्यास सांगितले होते

'मॅडम बोल रही है वही गाना रातभर बजाओ', असे म्हणत पबमधील पार्टीत तरूणीचा विनयभंग
पिंपरी : पबमधील पार्टीत डान्स करताना तरुणीने डीजेला गाणे बदलण्यास सांगितले. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने तरुणीचा विनयभंग केला. जगताप डेअरी येथील १८ डिग्रीज रूफ टॉप रेस्टो लॉंज पब येथे रविवारी (दि. २८) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. तरुणीने याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ३५ ते ४० वयोगटातील एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास तरुणी ही जगताप डेअरी चौक, पिंपळे सौदागर येथील येथील १८ डिग्रीज रूप टॉप रेस्ट लॉज पब, स्पॉट १८ मॉल येथील पबमध्ये गेली होती. यावेळी मित्रांसोबत पार्टीमध्ये डान्स करत असताना तरुणीने डिजेला गाणे बदलण्यास सांगितले. त्यावेळी एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या मागे आला. मॅडम जो गाना बोल रही है वही बजना चाहिये रातभर, असे म्हणून अज्ञात व्यक्तीने फिर्यादी तरुणीशी गैरवर्तन केले. तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न करून तिचा विनयभंग केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पवार तपास करत आहेत.