Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir: हर्षवर्धन सदगीरला ज्येष्ठ नेते शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 11:06 IST2026-03-26T11:03:20+5:302026-03-26T11:06:51+5:30
Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir आता ऑलिम्पिक खेळण्याचे माझे ध्येय असून त्यासाठी शरद पवार यांची मदत प्रोत्साहन देणारी ठरली आहे - हर्षवर्धन सदगीर

Maharashtra Kesari Harshvardhan Sadgir: हर्षवर्धन सदगीरला ज्येष्ठ नेते शरद पवारांकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती
पुणे : खासदार शरद पवार यांनी डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीरला १२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती, तर काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला दोन वर्षांसाठी ५० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले आहे. मुंबईत हर्षवर्धन सदगीरसह अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी उद्योजक मोहसीन बागवान, कुस्ती प्रशिक्षक शिवाजी कोळी, महाराष्ट्र चॅम्पियन पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
हर्षवर्धन सदगीर याचे कौतुक करीत ऑलिम्पिकपटू होण्यासाठी पुढील २ वर्षांसाठी महिना ५० हजारप्रमाणे १२ लाखांचा शिष्यवृत्ती धनादेश दिला आहे. काका पवार यांच्या तालमीतील हर्षवर्धनसह ११ मल्लांनी पदकाची लयलूट केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलला ५० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य पवार यांनी दिले आहे. शरद पवार यांचे आभार व्यक्त करीत काका पवार म्हणाले की, पवार हे खेळाडूंसाठी तारणहार व आधार आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व पैलवान व खेळाडू कायम ऋणी आहोत. पवार यांनी केवळ घोषणाच केली नाही तर धनादेश देऊन वेळीच विजेत्यांचे व प्रशिक्षण केंद्राचे कौतुक केले आहे. क्रिकेटनंतर इतक्या वेगाने पवार हेच कुस्तीगिरांसाठी अनेकदा धावून आले आहेत.
हर्षवर्धन सदगीर याने सांगितले की, गुरुवर्य काका पवार यांच्या सल्ल्यानंतर मी पुन्हा महाराष्ट्र केसरीच्या मैदानात उतरणार आहे. परंतु ऑलिम्पिक खेळण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी शरद पवार यांची मदत प्रोत्साहन देणारी ठरली आहे.
शासनाकडून नोकरीचे आश्वासन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही काका पवार व हर्षवर्धन सदगीर यांनी भेट घेतली. त्यावेळी येत्या अधिवेशनात नाशिक महापालिकेत नोकरी देण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याचे काका पवार यांनी सांगितले.