भेटण्यासाठी बोलावून कंपनीच्या एचआर तरुणीवर अत्याचार
By नितीश गोवंडे | Updated: January 10, 2024 16:16 IST2024-01-10T16:16:18+5:302024-01-10T16:16:49+5:30
‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्या घरातील लोकांना समजले की तुझ्याशी मी लग्न करतो’ असे आमिष तरुणीला दाखवले

भेटण्यासाठी बोलावून कंपनीच्या एचआर तरुणीवर अत्याचार
पुणे : कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या तरुणीला भेटण्यासाठी बोलवून घेत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. ६) दुपारी तीनच्या सुमारास खराडी येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी वडगाव शेरी येथे राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने मंगळवारी (दि. ९) चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून प्रवीण हराळ (२८, रा. नऱ्हे आंबेगाव) याच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही एका मॅनेजमेंट कंपनीत एचआर पदावर काम करत आहे. आरोपी प्रवीण याने फिर्यादी एचआर पदावर काम करत असताना तिच्या सोबत मैत्री केली. प्रवीण याने शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास खराडी येथील एका अपार्टमेंटमध्ये तरुणीला भेटण्यासाठी बोलवून घेतले. फिर्यादी या त्याठिकाणी आल्या असता आरोपीने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्या घरातील लोकांना समजले की तुझ्याशी मी लग्न करतो’ असे आमिष दाखवले. त्यानंतर प्रवीण हराळ याने तरुणी सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. घाबरलेल्या तरुणीने मंगळवारी पोलिस ठाण्यात आरोपी प्रवीण हराळ याच्या विरोधात तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पालवे करत आहेत.