Valentine Day 2025: ज्येष्ठांच्याही लव्ह लाइफचे नवे पर्व ‘हॅप्पी सिनिअर्स’; एकटेपणातून मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 13:42 IST2025-02-14T13:41:22+5:302025-02-14T13:42:35+5:30

जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात, ज्यांना मुलं विचारत नाहीत किंवा ती परदेशात स्थायिक झालेली असतात अशांना सोबती हवा असतो

happy seniors a new era in the love life of seniors Freedom from loneliness | Valentine Day 2025: ज्येष्ठांच्याही लव्ह लाइफचे नवे पर्व ‘हॅप्पी सिनिअर्स’; एकटेपणातून मुक्तता

Valentine Day 2025: ज्येष्ठांच्याही लव्ह लाइफचे नवे पर्व ‘हॅप्पी सिनिअर्स’; एकटेपणातून मुक्तता

पुणे: व्हॅलेंटाइन डे म्हटले की तरुण प्रेमीयुगुल वेगवेगळी गिफ्ट, फुलांचे बुकेज, चॉकलेट, डिनर डेट, मुव्ही प्लान आणि फार फार तर त्याच तारखेला प्रेमाच्या आणाभाका घेत १४ फेब्रुवारीचा लग्नमुहूर्त, हे झाले तरुणवर्गाचे; पण आपल्यासोबत असलेल्या आपल्या वृद्धांचा, त्यांच्या एकटेपणाचा, मानसिक आणि शारीरिक इच्छांचा विचार करणारी संस्था म्हणजे ‘हॅप्पी सिनिअर्स’.

प्रेमाला वयाचं बंधन कशाला? प्रेम केव्हाही आणि कोणत्याही वयात होऊ शकतं आणि ती तर आयुष्यभराची गरज. उतारवयात तर प्रेम हवंच, हेच कित्येकांचं जगणं सुसह्य करतं, या संस्थेनं अशा ९० जोडप्यांना एकत्र आणण्याचे काम केले आहे. उतारवयात जोडीदार सोबतीला असला की जगणं सुसह्य होतं. एरवी नोकरी आणि रोजच्या धावपळीत एकमेकांसोबत जगणंच राहून जातं. त्यात कधी पन्नाशी ओलांडते ते कळतच नाही आणि अचानक सोबतीचा जोडीदार जग सोडून जाण्याचा धक्का बसतो. ज्या जोडीदाराबरोबर सुखकर आयुष्य जगण्याची स्वप्नं पाहिलेली असतात, ती नाहीशी होतात.

मुलं नोकरी-व्यवसायात गुंतलेली असतात. त्यामुळे त्यांचं आपसूकच ज्येष्ठांकडे दुर्लक्ष होतं. एकटेपणाच्या सतत भेडसावणाऱ्या भावना नैराश्यापर्यंत पोहोचतात. या वयातसुद्धा जोडीदार हवा, असं त्यांना सातत्यानं वाटत असतं; पण समाज स्वीकारेल का, असा प्रश्न त्यांना पडतो. एकटं जगणाऱ्या अशा ज्येष्ठांच्या समस्येवर माधव दामले यांनी मागील काही वर्षांपासून काम सुरू केले आहे. या संस्थेनं अनेकांचं जगणं पुन्हा आनंदी केलं आहे.

निवृत्तीचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात असंख्य ज्येष्ठ नागरिक एकटे राहत आहे. त्यांची मुले परदेशात किंवा नोकरीच्या निमित्ताने परराज्यात राहतात, तर काहींना मूलबाळ नसतं, मग त्यांच्यासाठी जोडीदारच सर्वस्व; पण जोडीदाराचं निधन झाल्यानंतर एकटं पडणं वाट्याला येतं. अशा एकटं राहणाऱ्यांसाठी माधव दामले यांनी ही संस्था २०१२ मध्ये सुरू केली.

दामले म्हणतात, ‘जे ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात, ज्यांना मुलं विचारत नाहीत किंवा ती परदेशात स्थायिक झालेली असतात. त्यांना एकटेपणा सातत्यानं त्रास देत राहतो. कुणी तरी सोबती हवा, असं त्यांना वाटत असतं. हाच मुद्दा घेऊन काही ज्येष्ठांशी सातत्यपूर्ण संवाद साधून त्यांना पुनर्विवाहासाठी तयार केलं. आम्ही त्या ज्येष्ठ व्यक्तीची आर्थिक स्थिती सर्वप्रथम पाहतो. स्वतःचं घर आहे का बघतो, त्यांचं समुपदेशन करतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ विसरून वर्तमानात कसं छान राहू शकतो याची जाणीव करून देतो. दर तीन महिन्यांनी मिटिंग आणि ट्रीप आयोजित करतो.

या वयात काय गरज?

- जीवनसाथीसोबत ५०-६० वर्षे राहिल्यावर पती अचानक सोडून गेला किंवा त्याचे निधन झाले, तर त्याच्यामागे राहिलेल्या महिलांची बरीच घुसमट होते. मुले त्यांच्या कामात व्यस्त, बऱ्याचदा बाहेरगावी राहणारी.
- दुसरीकडे एकटेपणा, शरीर थकलेले, असुरक्षितपणा, मनातील इच्छा-आकांक्षांमुळे येणारा अपराधीपणा यामुळे मन आधार शोधत असते. यावेळी हक्काच्या पार्टनरची गरज भासते.
- सून, जावई काय म्हणतील? लेकीचे सासरचे हसतील? या वयात काय गरज आहे? अशा विचाराने वृद्ध स्त्रिया म्हणाव्यात तशा अजूनही पुढे येत नाहीत. हे चित्र साधारणतः ग्रामीण भागात पाहायला मिळते. मात्र शहरी भागात याबाबतीत महिलांचाही आणि पुरुषांचा पुढाकार आहे.

Web Title: happy seniors a new era in the love life of seniors Freedom from loneliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.