भारताच्या नकाशातून अर्धे काश्मीर गायब; CICTAB च्या कार्यक्रमात मोठी चूक
By दत्ता लवांडे | Updated: February 6, 2025 15:39 IST2025-02-06T15:38:36+5:302025-02-06T15:39:42+5:30
CICTABच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या कार्यक्रम पत्रिकेतील प्रकार; पाकिस्तानात दाखवण्यात येणारा नकाशा पत्रिकेमध्ये

भारताच्या नकाशातून अर्धे काश्मीर गायब; CICTAB च्या कार्यक्रमात मोठी चूक
- दत्ता लवांडे
पुणे - आंतरराष्ट्रीय कृषी बँकिंग कोऑपरेशन आणि प्रशिक्षण केंद्र (CICTAB) यांच्याकडून पुण्यात एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. या पत्रिकेतील सदस्य देशांच्या नकाशामध्ये असलेल्या भारतीय नकाशामध्ये चूक झाली असून जम्मू काश्मिरचा अर्धा भाग गायब करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, CICTAB या संस्थेच्या वतीने आणि केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात "सहकाराच्या माध्यमातून समृद्धी : डिजीटल इनोव्हेशन आणि मुल्यसाखळी" ही आंतरराष्ट्रीय परिषद १३ फेब्रुवारीपासून १५ फेब्रुवारीपर्यंत पार पडणार आहे. या परिषदेमध्ये विविध देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहे.
CICTAB या संस्थेच्या सदस्य देशांमध्ये भारत, बांग्लादेश भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका या देशाचा सामावेश आहे. कार्यक्रम पत्रिकेमध्ये सर्व देशांचे नकाशे दाखवले असून भारताच्या नकाशामधून जम्मू आणि काश्मिरचा अर्धा भाग गायब करण्यात आला आहे. या पत्रकात वापरण्यात आलेला भारतीय नकाशा हा पाकिस्तानात दाखवला जात असल्यामुळे आता यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
काय आहे CICTAB?
कृषी बँकिंगमध्ये काम करण्यासाठी जानेवारी १९८३ मध्ये सरकारने स्थापन केलेली ही एक स्वायत्त संस्था आहे. या संस्थेचे मुख्यालय हे पुणे विद्यापीठाजवळ असलेल्या वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था (VAMNICOM) येथे आहे. ही संस्था कृषी बँकिंगच्या संदर्भातील प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते. त्याच संस्थेने हे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.