कौटुंबिक वादातून डॉक्टर पतीकडून पत्नीवर जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 20:45 IST2021-08-10T20:42:09+5:302021-08-10T20:45:27+5:30
कौटुंबिक वादातून घडला गंभीर प्रकार, आरोपी डॉक्टरला विश्रांतवाडी पोलिसांकडून अटक

कौटुंबिक वादातून डॉक्टर पतीकडून पत्नीवर जीवघेणा हल्ला, पुण्यातील धक्कादायक घटना
येरवडा : कौटुंबिक वादातून डॉक्टर पतीने स्वतःच्या डॉक्टर पत्नीवर चाकूने गंभीर जखमी केल्याची घटना रविवारी रात्री विश्रांतवाडी येथे घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी डॉ. रवी भादवड (वय ३६, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
डॉ. रवी हे मुंजाबा वस्ती येथे राहायला असून तेथेच त्यांचे क्लिनिक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या डॉक्टर पत्नी सोबत त्यांचे कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादातून चिडून जाऊन रविवारी रात्री रवी यांनी त्यांच्या पत्नीवर चाकूने वार केले. या घटनेत त्यांच्या पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी आरोपी डॉक्टरला विश्रांतवाडी पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम करत आहेत.