बोपोडीत भाईचा राडा; तलवार नाचवत तरुणावर केला प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 22:05 IST2021-06-21T22:05:32+5:302021-06-21T22:05:47+5:30
मोठ्याने आरडा-ओरडा करत आम्ही येथील भाई आहोत ,आमच्या नादी कोणी लागले तर त्यांना पाहून घेऊ अशी दिली धमकी

बोपोडीत भाईचा राडा; तलवार नाचवत तरुणावर केला प्राणघातक हल्ला
पुणे : हात दाखविल्यानंतरही दुचाकीस्वार न थांबल्याने दगड फेकून मारत तलवार नाचत परिसरात कथित भाईने आपल्या साथीदारासह बोपोडीत राडा घातला.
याप्रकरणी खडकी पोलिसांनी आकाश उत्तम गायकवाड (वय २९, रा. कमलबाई बहिरट चाळ, बोपोडी) याला अटक केली आहे. गायकवाड व त्याचा साथीदार सिद्धांत चव्हाण या दोघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोघेही पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. शुभम स्वामी (वय २३, रा. बोपोडी) याने फिर्याद दिली आहे.
शुभम स्वामी हे दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी आरोपींनी आवाज देऊन त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र स्वामी थांबले नाहीत. त्यामुळे त्यांना दगड फेकून मारला. यावेळी आरोपींनी स्वामीवर तलवारीने वार केले. मात्र वेळीच प्रसंगावधान राखत त्याने तो चुकविला. आरोपींनी गाडीची तोडफोड करून स्वामीला जीवे ठार करण्याच्या हेतूने हातात तलवार व दगड घेऊन पाठलाग केला. त्यानंतर मोठ्याने आरडा-ओरडा करत आम्ही येथील भाई आहोत आमच्या नादी कोणी लागले तर त्यांना पाहून घेऊ अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. पोलीस उपनिरीक्षक अमोल भोसले अधिक तपास करीत आहेत.