आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 05:07 PM2023-11-26T17:07:20+5:302023-11-26T17:08:12+5:30

पिकांच्या काढणीस सुरुवात झाल्याने पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता

Hail rain with gale force in Avasari area of Ambegaon taluka | आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या अवसरी खुर्द ,अवसरी बुद्रुक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन वाजता वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडल्याने शेतकऱ्याची एकच तारांबळ उडाली होती. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या तरकारी मालाचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची उस, कडवळ, मका, ही पीके भुईसपाट झाली आहे. तर अवसरी येथील स्वागत कमान ही ट्रॅक्टर वर पडली असून ट्रॅक्टर मध्ये कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

आज सकाळपासूनच हवेत उष्णता जाणवत होती. आज रविवारी तीन ते साडेतीन वाजता अवसरी खुर्द येथे गारांचा पाऊस झाला त्यानंतर वादळी वारा जोरात आला अवसरी फाटा येथे अवसरी खुर्द गावातील श्री काळभैरवनाथ सप्ताह निमित्त लोखंडी स्वागत कमान उभारली होती. मात्र वादळी वाऱ्यासह पावसामुळे ही स्वागत कमान रस्त्यावर पडली त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील वाहतूक अर्धा तास बंद होती. तसेच अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली अनेक ठिकाणी बटाटा काढणीस सुरुवात झाली असून या पावसामुळे बटाटा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच शेतात उभे असलेली कडवळ, मका, उस हि पिके भुई सपाट झाली आहेत. या पावसाचा फटका तरकारी पिकांनाही बसणार असून यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. मंचर परिसरातील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पुणे नाशिक महामार्गावर पाणीच पाणी साचले होते. तसेच मंचर येथील उंबर हॉटेल जवळ मोठे लिंबाचे झाड कोसळून महावितरणच्या वीज वाहक तारांवर पडून काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. तसेच या झाडाच्या खाली उभी असलेली चार चाकी वाहनावर झाड पडल्याने वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Hail rain with gale force in Avasari area of Ambegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.