GBS Outbreak: पुण्यात गिलियन बॅरे सिंड्रोम (GBS) बाधित आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नांदेडगाव येथील ६५ वर्षीय ज्येष्ठ महिलेने ससून रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. मागील १५ दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र प्रकृती गंभीर होत गेल्याने तिचा मृत्यू झाला. ही महिला जीबीएस बाधित रुग्णांपैकी एक होती. पुण्यातील नांदेडगावात अनेक रुग्ण या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील हा तिसरा बळी असून, राज्यातील हा चौथा मृत्यू आहे.रुग्णसंख्येत वाढ; आरोग्य विभागाचा इशारापुणे शहरात जीबीएस रुग्णांची संख्या वाढत असून, सध्या १३० रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी २० जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाने नागरिकांना घाबरू नये, पण आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. दूषित अन्न आणि पाण्यामुळे हा आजार होऊ शकतो, त्यामुळे पाणी उकळून गार करून पिण्याची, तसेच स्वच्छता पाळण्याची सूचना करण्यात आली आहे. जीबीएस म्हणजे काय?गिलियन बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मिळ आजार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली स्वतःच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. यामुळे हात-पायांमध्ये कमजोरी, मुंग्या येणे, आणि काही प्रकरणांमध्ये पक्षाघात होऊ शकतो. योग्य उपचारांनी रुग्ण बरे होऊ शकतात, परंतु काही प्रकरणांमध्ये आजार गंभीर होऊ शकतो.नागरिकांनी घ्यावयाची काळजी• पाणी उकळून गार करून प्या: दूषित पाण्यामुळे संसर्ग होऊ शकतो, त्यामुळे पाणी उकळून पिणे आवश्यक आहे.• अन्नाची स्वच्छता: अन्न स्वच्छ आणि शिजवलेले असावे.• वैयक्तिक स्वच्छता: हात नियमितपणे साबणाने धुवावेत.• लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या: कमजोरी, मुंग्या येणे किंवा इतर लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.जीबीएस बाधित रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनली आहे. आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
GBS Outbreak: पुण्यात जीबीएस बाधित तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू; रुग्णसंख्या १३० वर, २० जण व्हेंटिलेटरवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 12:42 IST