Guillain Barre Syndrome: "भात, चीज आणि पनीर खाणं टाळा"; गुइलेन बॅरे सिंड्रोमपासून वाचण्यासाठी एम्सच्या डॉक्टरांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:23 IST2025-01-27T15:58:32+5:302025-01-27T17:23:16+5:30
GBS Prevention Tips: जीबीएस हा एक हा अत्यंत दुर्मिळ आजार असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे आता तज्ञ्जांकडून आहाराची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केलं जात आहे.

Guillain Barre Syndrome: "भात, चीज आणि पनीर खाणं टाळा"; गुइलेन बॅरे सिंड्रोमपासून वाचण्यासाठी एम्सच्या डॉक्टरांचा सल्ला
Guillain Barre Syndrome: गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजारामुळे सध्या राज्यात चिंतेंचे वातावरण आहे. पुण्यात जीबीएस आजाराचे एकाच दिवसात २८ रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या १०१ वर पोहोचली आहे. त्यातील १६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून रुग्ण सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सोलापूरमध्ये एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला असून व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. जीबीएस हा एक हा अत्यंत दुर्मिळ आजार असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे आता तज्ञ्जांकडून आहाराची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केलं जात आहे.
पुण्यातील जीबीएसच्या वाढत्या प्रकरणांमागे कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू महत्त्वाचं कारण आहे. कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीमुळे सामान्यतः पोटात संक्रमण होते आणि तो जीबीएसच्या वाढीचे कारण ठरत आहे. जीबीएस सामान्यतः व्हायरल किंवा विषाणूच्या संसर्गानंतर होतो. दूषित किंवा कमी शिजवलेलं मांस, पाश्चर न केलेले दुग्धजन्य पदार्थ किंवा अशुद्ध पाण्याच्या सेवनाने हा जीवाणूची लागण होते. त्यामुळे आता तज्ञ्जांकडून काही या आजाराची लागण टाळण्यासाठी काही पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जात आहेत.
एम्स दिल्ली मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉ.प्रियंका सेहरावत यांनी यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. या आजारापासून वाचायचे असेल तर बाहेरचे अन्न खाणे टाळा. हे या आजाराचे मुख्य कारण असल्याचे डॉक्टर प्रियंका सेहरावत यांनी म्हटलं. "जरी याची इतर अनेक कारणे असली तरी हे एक कारण आहे ज्याबद्दल आपणा सर्वांना माहित असणे आवश्यक आहे. कारण हे आपण टाळू शकतो. त्यासाठी तुम्ही बाहेरचे अन्न खाऊ नका आणि अशुद्ध पाणी पिऊ नका. महत्त्वाचे म्हणजे चीज, पनीर, भात यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करू नका. तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीची विशेष काळजी घ्या. हे देखील लक्षात ठेवा की हा आजार दोन आठवड्यांच्या आत उपचाराने बरा केला जातो," असं प्रियंका सेहरावत यांनी म्हटलं.
पनीर, तांदूळ आणि चीजमध्ये जीवाणूंची शक्यता जास्त असते कारण त्यांच्यात जास्त आर्द्रता असते. चीज आणि पनीर हे दुग्धजन्य पदार्थ आहेत, म्हणून जर ते योग्यरित्या साठवले गेले नाहीत तर ते लिस्टेरिया, साल्मोनेला हे जीवाणू तयार होण्याची शक्यता असता. तर शिजवलेल्या भातामध्ये बॅसिलस सेरियस असू शकतो जे सामान्य तापमानावर विषाणू तयार करू शकतात.
गुइलेन बॅरे सिंड्रोमची लक्षणे
हात आणि पाय सुन्न होणे
हात आणि पायांना मुंग्या येणे
स्नायूंची कमजोरी
चेहरा, डोळे, छाती आणि हातपाय यांच्या स्नायूंचा अर्धांगवायू
छातीचे स्नायू अर्धांगवायू झाल्यामुळे श्वास घेण्यात समस्या