हिरव्यागार डोंगररांगा, बरसणाऱ्या सरी अन् शीतल गारवा, बाराही महिने श्रावणच हवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:00 IST2025-07-25T11:57:40+5:302025-07-25T12:00:07+5:30
‘श्रावण’ नुसतं नाव उच्चारलं तरी मनात आनंदाची एक झुळूक उमटते. हिरव्यागार डोंगररांगा, नभातून बरसणाऱ्या सरी, शीतल गारवा अशी सुखद अनुभूती देणारा श्रावण महिना शुक्रवारपासून सुरू होत आहे.

हिरव्यागार डोंगररांगा, बरसणाऱ्या सरी अन् शीतल गारवा, बाराही महिने श्रावणच हवा!
कृष्णकुमार गोयल
अध्यक्ष, कोहिनूर ग्रुप आणि उपाध्यक्ष, पुणे फेस्टिव्हल
हिंदू आणि जैन धर्मात श्रावणाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. फुललेला निसर्ग, सर्वत्र बहरलेली हिरवाई, पवित्र सणांची रेलचेल, शाकाहाराचा उद्घोष, चातुर्मास अशा अनेक बाबींमुळे श्रावण महिना पवित्र मानला जातो. हसरा, फुललेला, सुगंधाने गंधीत झालेला आणि तनामनात एक चैतन्याची लाट फुलविणारा हा ‘श्रावण’ प्रत्येकाच्या मनाला व्यापून टाकतो. त्याची चाहूल लागते ती आकाशात उमटणाऱ्या इंद्रधनुष्याच्या कमानीने, तर कधी ढगाआडून हसलेल्या उन्हामुळे! .
श्रावणातील पावसाची सर ही जणू मनात एक आनंदगीतच गात येत असते. श्रावणाची असंख्य मराठी भावगीते रसिकांच्या मनावर रुंजी घालतात, तशीच अन्य भारतीय भाषांमध्येही ‘सावन’च्या गीतांचा खजिना अनुभवास मिळतो. मराठी मनाला लता मंगेशकरांनी गायलेलं ‘श्रावणात घन निळा बरसला...’ आजही चिरतरुण वाटतं, तर हिंदी सिनेमांमध्ये ‘सावन’वर आधारित असंख्य गीतं आजही मनात घर करून आहेत.
श्रावणात येणारे नागपंचमी, नारळी पौर्णिमा, दहीहंडी, पोळा, मंगळागौर - हे केवळ उत्सव नाहीत, तर संस्कृतीची आठवण करून देणारे सोहळे आहेत. प्रत्येक सणात नात्यांची गोडी, परंपरेची जोड आणि आनंदाची उधळण असते. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करणे महाराष्ट्रात प्रचलित आहे. श्रावणी सोमवारी श्री शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे हा तर प्रत्येकाच्या श्रद्धेचाच भाग. या दिवशी कोट्यवधी भाविक उपवास करतात. उत्तर भारतात लाखो लोक पायी कावड घेऊन जात धर्म श्रद्धेची आराधना करतात. असा हा प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा श्रावण महिना जुलैच्या उत्तरार्धात पौर्णिमेपासून सुरू होतो आणि ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात पुढील पौर्णिमेच्या दिवशी संपतो. तामिळनाडूत ‘अवनी’, बंगालमध्ये ‘श्राबोन’ अशा विविध नावांनी श्रावण महिन्याचा उल्लेख होतो. श्रावण हा वर्षा ऋतूचा दुसरा महिना असतो.
श्रावण महिन्यात पडणाऱ्या जलधारांनी नद्या भरून वाहतात, तळी-विहिरी व धरणे पाण्याने भरतात. जमिनीखाली पाणी मुरत राहते, त्यामुळे भूगर्भजल पातळी वाढते. शेतीतील खरीप पिकांना हा पाऊस म्हणजे वरदानच असतो. वृक्ष, वेली, शेती, फळझाडे, फुले या साऱ्यांनाच बहर येत असतो. निसर्गातील प्राणी व पक्ष्यांना तृप्त ठेवणारा हा श्रावण महिना असतो. या काळात अनेक भक्त मांसाहार टाळून शाकाहाराचा स्वीकार करतात. जणू सृष्टीला नवं बळ मिळतं.
चातुर्मासाचा कालखंडही हाच असतो. जैन धर्मीयांमध्ये सर्वत्र विहार करणारे साधुसंत, मुनी, आचार्य, साध्वी एका ठिकाणी साधना करतात. वातावरणात शांतता आणि अध्यात्म भरून राहतो. या चातुर्मास काळात लाखो भक्त श्रद्धेने दर्शनासाठी येतात.
श्रावण हा केवळ एक ऋतू नाही - तो निसर्ग, अध्यात्म, श्रद्धा आणि आनंद यांचा सुंदर संगम आहे. तो जीवनात चैतन्य, उमेद आणि समाधान फुलवतो. म्हणूनच वाटतं - दर महिना श्रावण असावा, दरक्षणी मनात श्रावण रुंजी घालावा !