Pune Crime:गुंडाच्या टोळक्याची कामगाराला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण; पुण्यातील धक्कदायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 14:48 IST2022-03-28T14:48:10+5:302022-03-28T14:48:38+5:30
रुग्णालयात कामगारावर उपचार करण्यात येत असून अजूनही तो बेशुद्धावस्थेत आहे.

Pune Crime:गुंडाच्या टोळक्याची कामगाराला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण; पुण्यातील धक्कदायक घटना
पुणे : महावितरणची केबल टाकण्याचे काम सुरु असताना टेम्पो साईडला घेण्यासाठी सांगितल्याने गुंडांच्या टोळक्याने कामगारास लाकडी बांबु, लोखंडी रॉड, लोखंडी पाईपने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण करण्यात आली.
अक्षय नवणे (वय २३, रा. पिसोळी) असे या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी अल्ताफ सलीम शेख (वय १८, रा. बालाजीनगर, धनकवडी), राजकुमार शामलाल परदेशी (वय २४) आणि सुफियान बशीर शेख (वय १८, रा. बालाजीनगर, धनकवडी) या तिघांना अटक केली आहे. हे तिघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या इतर ३ साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पिसोळीमधील इंडस्ट्रीयल झोनमधील मोहन मार्बल वेअर हाऊसकडे जाणार्या गल्लीमध्ये शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी स्वप्नील बाळासाहेब मासाळ (वय ३१, रा. पिसोळी गावठाण, पिसोळी) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडस्ट्रीयल झोनमध्ये महावितरणची अंडर ग्राऊंड केबल टाकण्याचे काम सुरु होते. या कामाची देखभाल कामगार अक्षय नवणे हे करत होते. या ठिकाणी रस्त्यावर एक टेम्पो उभा होता. अक्षय याने टेम्पोचालकाला टेम्पो रोडवरुन साईडला घे, असे सांगितले. याचा राग येऊन टेम्पोचालकाने सराईत गुन्हेगारांच्या मदतीने अक्षय नवणे यांना लाकडी बांबु, लोखंडी रॉड, पाईपने डोक्यात व पाठीवर, हातावर बेदम मारहाण केली. यात अक्षय बेशुद्ध पडला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना अटक केली आहे. अक्षय याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून अजूनही तो बेशुद्धावस्थेत आहे. सहायक पोलीस निरीक्षक मधाळे तपास करीत आहेत.