प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी...! पुण्यातून उन्हाळी सुटीनिमित्त धावणार ४५० जादा बस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:45 IST2026-03-19T12:45:13+5:302026-03-19T12:45:31+5:30
- पुण्यातून कोल्हापूर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोकण मार्गावर बस

प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी...! पुण्यातून उन्हाळी सुटीनिमित्त धावणार ४५० जादा बस
पुणे : उन्हाळी सुट्या सुरू झाल्यावर पुण्यातून गावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्यामुळे पुणे एसटी विभागातून कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोकण यांसह राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या प्रवाशांना एसटीचा प्रवास सुखकर आणि वातानुकूलित व्हावा, यासाठी पुणे एसटी विभागाकडून (दि. १५) एप्रिल ते जूनपर्यंत ४५० जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. या बस दि. १५ जूनपर्यंत धावणार आहेत.
राज्यातील इतर भागातून तसेच बाहेरील राज्यातील लाखो नागरिक नोकरी, शिक्षण किंवा व्यवसायानिमित्त पुण्यात स्थायिक आहेत. शाळा, महाविद्यालयांना सुट्या सुरू होताच गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जाण्याचे नियोजन केले जाते. त्यासाठी महिन्याभरापासूनच रेल्वे, एसटी यासह खासगी बसचे सीट आरक्षित केले जाते. मात्र, ज्या कुटुंबीयांचे नोकरीच्या ठिकाणी सुट्या किंवा अन्य कारणांमुळे चार ते आठ दिवस आधी बाहेरगावी जायचे नियोजन होते. अशावेळी रेल्वेचे बुकिंग फुल्ल असते, तर एसटीलाही प्रवाशांची मोठी गर्दी होते. त्यामुळे प्रवाशांना अडचणी येऊ नये, यासाठी बससेवा उपलब्ध व्हावी, यासाठी पुणे एसटी विभागाकडून १५ एप्रिल ते १५ जूनदरम्यान जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत
दरवर्षी शाळांच्या परीक्षा १० ते १२ एप्रिलपर्यंत संपतात. त्यानंतर नागरिकांचे बाहेरगावी जाण्याचे नियोजन होते. मात्र, यंदा परीक्षांचे वेळापत्रक बिघडले आणि २५ एप्रिलपर्यंत परीक्षा सुरू राहणार आहेत. त्यामुळे आगारात प्रवाशांची गर्दी २५ एप्रिलनंतर वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
तीनशे ते पाचशे जादा बस
स्वारगेट आगारातून बोरिवली, ठाणे, दादर, सोलापूर, कोल्हापूर, कल्याण, पंढरपूर, तर पुणे स्टेशन आगारातून दादर, तर शिवाजीनगर आगारातून छत्रपती संभाजीनगर, नाशिक, लातूर, धुळे, अकोला, सोलापूर, भीमाशंकर, बोरिवली या मार्गावर नियमित बस धावतात. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये चारशे ते पाचशे जादा बसफेऱ्यांचे नियोजन केले जाते. त्यानुसार यंदाही प्रवाशांच्या गर्दीनुसार जादा बस सोडण्यात येणार आहेत.
प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे विभागातून जादा बस सोडण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास करण्यापेक्षा सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांनी एसटीचा लाभ घ्यावा. - अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे