६ महिन्यांच्या बाळाच्या घशात सोन्याचा दागिना; पालक घाबरले, डॉक्टरांच्या तत्परतेने जीव वाचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 13:01 IST2025-07-23T12:59:23+5:302025-07-23T13:01:14+5:30
हॉस्पिटलमध्ये घेऊन येईपर्यंत बाळाचा जीव गुदमरण्यास सुरुवात झाली होती, तसेच बालकाच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाला होता

६ महिन्यांच्या बाळाच्या घशात सोन्याचा दागिना; पालक घाबरले, डॉक्टरांच्या तत्परतेने जीव वाचला
बारामती: देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यय सोमवारी (दि. २१) बारामतीमध्ये आला. साडेसहा महिन्यांच्या बालकाच्या घशात दागिना अडकला. मात्र, बारामतीच्या डाॅक्टरांच्या तत्परतेने साडेसहा महिन्यांच्या बालकाचा जीव बचावला.
एका साडेसहा महिन्यांच्या बाळाच्या घशात आणि श्वासनलिकेत सोन्याचा दागिना अडकल्याचा प्रकार सोमवारी (दि. २१) सकाळी घडला. या बालकाच्या घशात स्वरयंत्राच्या असलेल्या कंठातील पोकळीच्या भागामध्ये ३.५ सें. मी. लांबीचे आणि एका बाजूने धारदार असलेले सोन्याचे कानातले अडकले. बाळाला त्रास होऊ लागल्याचे लक्षात येताच पालक खूप घाबरून गेले. त्यांनी ताबडतोब बारामतीमधील भिगवण रस्त्यावरील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. मुथा यांच्या श्रीपाल हॉस्पिटल येथे बालकाला आणले. यावेळी हॉस्पिटलमध्ये घेऊन येईपर्यंत बाळाचा जीव गुदमरण्यास सुरुवात झाली होती, तसेच बालकाच्या तोंडातून रक्तस्राव सुरू झाला होता.
बाळाला ताबडतोब हॉस्पिटलमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा , डॉ. सौरभ मुथा आणि डॉ. प्रियांका मुथा यांच्या साहाय्याने बारामतीमधील नाक, कान, घसातज्ज्ञ डॉ. वैभव मदने आणि भूलतज्ज्ञ डॉ. अमर पवार त्यांच्या मदतीने अतिशय कौशल्यपूर्वक आणि जोखमीची शस्त्रक्रिया व स्कोपी पार पाडण्यात आली. संबंधित बालकाच्या घशातून दुर्बिणीद्वारे हे सोन्याचे कानातले यशस्वीरीत्या काढण्यात यश आले.
अवघ्या काही मिनिटांत बारामतीच्या या सर्व डॉक्टरांनी सामूहिक प्रयत्न केल्याने या साडेसहा महिन्यांच्या बालकाला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून परत आणले. सर्व डॉक्टरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सर्व डॉक्टरांनी मिळून त्याच्यावरती उपचार करून त्याला जीवनदान दिले. पालकांनी श्रीपाल हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार मानताना पालकांचे डोळे पाणावले.