पुणे : पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी पाहता, खडकवासलामधून पाणीपुरवठा होणे शक्य नाही. त्यामुळे पुणेकरांसाठी मुळशी धरणातूनपाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, त्यावर लवकरच मार्ग निघेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. पाटील यांनी शुक्रवारी कोथरूड विधानसभा मतदारसंघातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. त्यानंतर ते बाेलत हाेते. पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, अधीक्षक अभियंता श्रीकांत वायदंडे, प्रसन्नराघव जोशी, कार्यकारी अभियंता विनोद क्षीरसागर, उप अभियंता प्रशांत कदम, कनिष्ठ अभियंता गणेश काकडे उपस्थित होते.
समान पाणीपुरवठा प्रकल्प अंतर्गत पुणे शहरात १४१ झोन निश्चित केले असून, त्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात एकूण १७ झोन आहेत. अस्तित्वातील वितरण नलिका व आवश्यकतेनुसार नवीन जलवाहिन्या टाकून नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे, असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी पाटील यांना दिली. तसेच कोथरूड मतदारसंघातील १७ झोनमधील अस्तित्वातील नवीन पाण्याच्या टाक्क्यांपैकी १६ टाक्क्यांचे काम पूर्ण झाले असून आयडियल कॉलनी टाकीच्या जागेबाबत लॉ कॉलेज, पुणे महापालिका यांच्यामध्ये जागेबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या टाकीचे काम अपूर्ण असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर सदर सर्व कामे जलदगतीने पूर्ण करावीत, तसेच आयडियल कॉलनीच्या टाकीचा प्रश्न सामोपचाराने सर्वांना विश्वासात घेऊन मार्गी लावावा, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.
२३ हजार २०९ मीटर बसविले
समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत कोथरूडमधील १७ झोनमध्ये २८ हजार ३९७ इतके पाण्याचे मीटर बसविणे प्रस्तावित आहे. त्यापैकी २३ हजार २०९ पाण्याचे मीटर बसवले आहेत. उर्वरित ५ हजार मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे पाण्याच्या गळतीचे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी झाले असून, २० टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी आवश्यक कामे सुरू आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिले.