दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाबरोबर राहिलेल्या निष्ठावंतांना न्याय द्या; इच्छुकांनी मांडली प्रदेशाध्यक्षांसमोर भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:31 IST2025-12-19T15:30:12+5:302025-12-19T15:31:53+5:30
अजित पवार गटाबरोबर आघाडी झाल्यास आपल्या पक्षातील प्रस्थापितांना उमेदवारी मिळणार आहे, अशा वेळी आपल्या पक्षाबरोबर राहिलेल्या निष्ठावंतांना न्याय दया

दोन्ही निवडणुकांमध्ये पक्षाबरोबर राहिलेल्या निष्ठावंतांना न्याय द्या; इच्छुकांनी मांडली प्रदेशाध्यक्षांसमोर भूमिका
पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर राहिलेल्या निष्ठावंतांना महापालिका निवडणुकीत उमेदवारी देउन न्याय द्या अशी भुमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुकांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या समोर मांडली.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील इच्छुकांची मते प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जाणुन घेतली. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बापु पठारे, माजी आमदार अशोक पवार , माजी शहराध्यक्ष रविंद्र माळवदकर आदी उपस्थित होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाबरोबर आम्ही राहुन निष्ठेने काम केले आहेत. आता पक्षातील काही लोक राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाबरोबर आघाडी करावी असे मत व्यक्त करत आहे. ही आघाडी झाली तर केवळ आपल्या पक्षातील प्रस्थापितांना उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर राहिलेल्या निष्ठावंतांना न्याय दया अशी भुमिका अनेकांनी मांडली. भाजपविरोधात आपल्याला निवडणुक लढवायची आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉगेस अजित पवार गटाबरोबर आघाडी करावी असे मतही काही कार्यकत्यानी मांडले.
पक्ष नेतृत्व घेईल तो निर्णय मान्य
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष , माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे निवडणुकीबाबत जो निर्णय घेतील तो मान्य राहिल असे कार्यकत्यांनी एकमताने सांगितले.