Girls beware ... 'Nirbhaya' number of social media is bogus | मुलींनो सावधान... सोशल मीडियावरील ‘निर्भया’ नंबर बोगसच
मुलींनो सावधान... सोशल मीडियावरील ‘निर्भया’ नंबर बोगसच

ठळक मुद्देखरंच अडचणीत असलेल्यांना बसू शकतो फटका

दीपक होमकर - 
पुणे : तरुणींनी संकटसमयी पोलिसांची मदत मागण्यासाठी   हा ‘निर्भया’ नावाचा नंबर सेव्ह करावा त्यावर मिस कॉल दिल्यास काही वेळात पोलीस मदतीला येतील, अशा आशयाने मेसेज  सोशल मीडीयावर व्हायरल होत आहेत. मात्र, तो पोलिसांचा नंबर नसून, त्यातील काही नंबर हे बंद आहेत तर काही नंबर हे सर्वसामान्य लोकांचे असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत स्पष्ट झाले आहे.
हैदराबाद येथील तरुणीवर चार तरुणांनी सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याने सारा देश हादरला. या घटनेवर देशभरातून सोशल मीडीयावर सातत्याने कमेंट आणि पोस्ट सुरु आहेत. त्यापैकीच एका कमेंटमध्ये ‘निर्भया’ नावाने व्हायरल होत असलेला मोबाइल नंबर. विशेष म्हणजे एकाच आशयाच्या अनेक मेसेजमध्ये ‘निर्भया’ या नावाने वेगवेगळे नंबर आहेत. त्या सर्व नंबरवर ‘लोकमत’च्या टीमने फोन केला तेंव्हा त्यातील काही नंबर बीडचे काही सोलापूरचे सामान्य नागरिकांचे नंबर होते. मात्र बहुतांश नेटीझन्स हा नंबर खात्री न करताच सेव्ह करत आहेत, तर अनेकजण हा नंबर म्हणजे पोलीस हेल्पलाइन असल्याचा समजून व्हायरल करत आहेत.  संकट काळात मदतीसाठी तरुणींनी जर सोशल मीडीयावर आलेल्या ‘निर्भया’या नंबरवर मिस कॉल व मेसेज केल्यास त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे शक्यतो असा नंबर तरुणींनी सेव्ह करू नये वा व्हायरल करू नये.
.............
पोलिसांच्या संदर्भातील व्हॉट्सअ‍ॅपवर येणारे मेसजेस तपासून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये. पोलीस हेल्पलाइनसाठी ‘१००’ हा  देशभरातील अधिकृत नंबर आहे. त्यावर येणारे सर्व कॉल, मिसकॉलसुद्धा रेकॉर्ड केले जातात. त्याच्या नोंदी ठेवल्या जातात. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांच्या मदतीसाठी १०० नंबरवरच संपर्क करावा. नागरिकांनी अन्य कोणतेही नंबर सेव्ह करू नये किंवा आलेले नंबर फॉरवर्ड करू नयेत.- के. व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे.
असा आहे व्हायरल मेसेज
तुम्ही एकट्या असाल आणि काही अडचणी आल्या तर ‘निर्भया’ विशिष्ट नंबरवर मिस कॉल करा किंवा ब्लँक मेसेज पाठवा.  त्यामुळे पोलीस तुमच्या मोबाइलचे लोकेशन शोधून तुमच्यापर्यंत पोचतील. हा मेसेज जास्तीजास्त माता-भिगिनींपर्यंत पोहोचवा, असा मेसेज सध्या व्हायरल होत आहे. 
.........
बनावट नंबरमुळे तरुणींच्या अडचणी वाढू शकतात 
निर्भया या नावाने व्हायरल होणाºया नंबरमध्ये वेगवेगळे नंबर फिरत आहेत. त्यामध्ये  विशिष्ट नंबर सर्वात जास्त व्हायरल होत असून, त्या नंबरला डायल केल्यावर तो अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात येते. त्याशिवाय आणखी एका नंबरवर कॉल केल्यावर तो नंबर आंबेजोगाई येथील एका सामान्य नागरिकाचा निघाला.  जर एखाद्याने   व्हायरल झालेला ‘निर्भया’ नंबर डायल केला व तो नंबर रोडरोमिओचा असला तर एकट्या तरुणीला निर्जन स्थळी गाठू शकेल व तरुणीच्या संकटात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे नंबर कुणीही व्हायरल करू नयेत व आपल्या माता भगिनींच्या मोबाइलमध्ये सेव्ह करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.    
 

Web Title: Girls beware ... 'Nirbhaya' number of social media is bogus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.