जीबीएस आजाराचा पुण्यात शिरकाव; शरद पवारांचं सरकारला आवाहन, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:57 IST2025-01-22T16:54:41+5:302025-01-22T16:57:02+5:30
पुणे महापालिका प्रशासन व राज्य सरकारने ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरीता योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन पवार यांनी केलं आहे.

जीबीएस आजाराचा पुण्यात शिरकाव; शरद पवारांचं सरकारला आवाहन, म्हणाले...
NCP Sharad Pawar: जीबीएस आजाराचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडे केलं आहे. "जीबीएस अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराने पुणे शहर आणि शहरालगत काही भाग विशेषतः सिंहगड रस्त्यावरील पुणे मनपामधील नवी समाविष्ट गावांमध्ये नागरीक बाधित झाल्याचे निदर्शनात आले आहे. या दुर्मिळ आजाराची दाहकता लक्षात घेता आणि नागरिकांमध्ये वाढलेले भीतीचे वातावरण ही एक चिंतेची आणि गंभीर बाब म्हणावी लागेल. दूषित पाण्यातून या आजाराचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासन व राज्य सरकारने ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरीता योग्य ती खबरदारी घ्यावी," असं आवाहन पवार यांनी केलं आहे.
"संभाव्य संकटाचे अतिदक्षतापू्र्वक योग्य नियोजनातून निराकरण करण्याची भूमिका प्रशासनाने घ्यावी, अशी अपेक्षा आहे," असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, ‘जीबीएस’ हा दुर्मीळ ‘न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर’ आहे. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास पटकन लागण होते. मज्जातंतू हळूहळू निकामी करून आजाराचा विषाणू बोट, पाय, हात, फुप्फुस, श्वसननलिकेवरही हल्ला चढवतो. रुग्णांची अवस्था पक्षाघात म्हणजे लकवा आल्यासारखी होते.
आजाराची लक्षणे काय?
हात आणि पायातील स्नायू कमकुवत होतात. रुग्णाला बसण्या व उठण्यात त्रास होतो. श्वास घेण्यास त्रास होतो. काही रुग्णांमध्ये चालताना किंवा उभे राहताना तोल जातो. डोळ्याचे स्नायू कमकुवत होऊन दृष्टी कमी होते. दोन-दोन दिसायला लागतात. काही रुग्णांमध्ये गिळायला त्रास होतो. काहींमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त स्नायू कमकुवतही होऊ शकतात. काहींना अर्धांगवायूचा त्रास सुरू होतो.