मित्रांसोबत पुण्यातील सिंहगड किल्ला बघायला आलेला गौतम गायकवाड २० ऑगस्ट रोजी बेपत्ता झाला होता. तानाजी कड्याजवळ तो लघुशंकेला गेला आणि आलाच नाही. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तो पळून जातानाही दिसला. पण, सापडला नाही. अखेर रविवारी सांयकाळी त्याचा ठिकाणा सापडला. पाच दिवसानंतर गौतम पोलिसांना कसा सापडला, याबद्दल पोलिसांनी माहिती दिली.
पोलीस अधिकारी संदीप सिंह गिल यांनी सांगितले की, संध्याकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान गौतम गायकवाड बेपत्ता झाला होता. तो त्याच्या चार मित्रांसह फिरण्यासाठी आला होता. तेव्हापासून तो बेपत्ता झाला होता.
पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत तपास सुरू केला होता. हवेलीची आपत्ती निवारण टीम, पोलीस पथक यांनी रात्रभर त्याचा शोध घेतला. एका ठिकाणी त्याची चप्पल सापडली. पण, त्याच्याबद्दल काही कळले नव्हते.
कुठे होता गौतम गायकवाड?
पोलीस अधिकारी गिल यांनी सांगितले की, रविवारी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांना ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्यांनी याची माहिती किल्ल्यावरील गार्डला दिली. गार्डने याबद्दल पोलिसांना कळवले.
त्यानंतर पोलीस पथक शोध घेत आवाज येत असलेल्या ठिकाणी पोहोचले. तेव्हा गौतम गायकवाड तिथे होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यावेळी तो सापडला, त्यावेळी त्याची प्रकृती पूर्ण बिघडलेली होती. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची चौकशी केली जाईल, असे गिल म्हणाले.