पुणे : भरचौकात आलिशान कार थांबवून सिग्नलच्या खांबावर लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाने मित्र भाग्येश ओसवालसह अंमली पदार्थाचे सेवन करून हा गुन्हा केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे, असे पोलिसांनी रविवारी न्यायालयात सांगितले.
गुन्हा करण्यापूर्वी गौरव आणि भाग्येश यांनी कुठल्या अंमली पदार्थाचे सेवन अथवा मद्यप्राशन केले, त्यांना पळून जाण्यास कोणी मदत केली, याबाबत तपास सुरू असल्याची माहितीही पोलिसांनीन्यायालयात दिली. त्यावर, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. एस. बारी यांनी दोन्ही आरोपींना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
गौरव आहुजावर खंडणी, जुगाराचाही गुन्हा
आरोपी गौरव आहुजा हा गुन्हेगारी वृत्तीचा असून, त्याच्यावर विमाननगर पोलिस ठाण्यात खंडणी मागणे, जिवे मारण्याची धमकी देणे, तसेच महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयाला सांगितली.
आहुजाचा बीअर बार..
आरोपी गौरव आहुजा याचे स्वारगेट परिसरात हॉटेल आणि बीअर बार असून, शुक्रवारी (दि. ७) तो मध्यरात्रीपर्यंत त्याच्या हॉटेलमध्येच होता. त्यानंतर कदाचित तेथूनच मद्य सोबत घेऊन विमाननगर परिसरात अन्यत्र गेला असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली. बेकायदा लॉटरी व्यवसायातून त्याने ही संपत्ती मिळवली असल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली.