९५० च्या गॅस सिलेंडरची २ हजारला विक्री; काळा बाजार सुरु असल्याने टंचाई, नागरिकांच्या एजन्सीबाहेर रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:37 IST2026-03-12T12:34:49+5:302026-03-12T12:37:05+5:30

९५० रुपयांच्या घरगुती गॅस सिलेंडरसाठी २ हजार रुपये आणि १,६५० रुपयात मिळणारी व्यवसायिक गॅस सिलेंडरची एक टाकी काळ्या बाजारात ४ हजार रुपयांमध्ये विक्री सुरू

Gas cylinder worth Rs 950 sold for Rs 2,000; Shortage due to black market, queues outside agencies for citizens | ९५० च्या गॅस सिलेंडरची २ हजारला विक्री; काळा बाजार सुरु असल्याने टंचाई, नागरिकांच्या एजन्सीबाहेर रांगा

९५० च्या गॅस सिलेंडरची २ हजारला विक्री; काळा बाजार सुरु असल्याने टंचाई, नागरिकांच्या एजन्सीबाहेर रांगा

चाकण : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता देशांतर्गत गॅसपुरवठ्यावर दिसू लागला असून,चाकण शहरात गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून गॅस सिलिंडरसाठी चाकणकरांना एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत.

गॅसपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे एकीकडे व्यावसायिक आणि औद्योगिक गॅसपुरवठा बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे घरगुती ग्राहकांनाही वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गॅसवर अवलंबून असलेल्या लघुउद्योगांचे कामकाजही पुढील काही दिवस ठप्प पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चाकण शहर व परिसरातील गॅस एजन्सींनी सध्या घरपोच सिलिंडर सेवा बंद केली आहे. परिणामी नागरिकांना एजन्सीसमोरच सिलिंडर मिळवण्यासाठी गर्दी करावी लागत आहे. रोजगार व दैनंदिन कामे सोडून दोन-दोन दिवस रांगेत उभे राहूनही सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी चाकण व परिसरातील गावांतील नागरिक करत आहेत. युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन अनेक एजन्सी चालकांनी गॅस सिलेंडर काळ्या बाजारात विक्री सुरू केली आ हे. ९५० रुपयांच्या घरगुती गॅस सिलेंडरसाठी २ हजार रुपये आणि १,६५० रुपयात मिळणारी व्यवसायिक गॅस सिलेंडरची एक टाकी काळ्या बाजारात ४ हजार रुपयांमध्ये विक्री सुरू आहे. परंतु ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या सिलेंडर धारकांना वेळेत गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्याचे नागरिक सांगत आहेत.

दरम्यान, चाकण परिसरात सलग तिसऱ्या दिवशीही गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सिलिंडर रिफिल बुकिंगच्या नियमातही बदल करण्यात आला असून आता २१ दिवसांऐवजी २५ दिवसांनंतरच बुकिंग करता येणार आहे. घरातील दुसरा सिलिंडरही संपत आल्याने गृहिणींची चिंता वाढली आहे. पुणे - नाशिक महामार्गावरील बालाजीनगर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागत आहेत.या रांगा अगदी महामार्गाच्या लगत असल्याने धोकादायक ठरू शकतात,मात्र याकडे संबधित एजन्सी चालकाकडून दुर्लक्ष होत आहे. गॅसचा तुटवडा आणि वितरणातील विलंब यामुळे ग्राहकांचा संयम सुटत चालल्याचे चित्र दिसून येत आहे.

दरम्यान, देशात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोलियम, पेट्रोलियम उत्पादने आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा व समतोल वितरण नियंत्रित करण्यासाठी १९५५ चा अत्यावश्यक वस्तू कायदा (एस्मा) लागू केला आहे. या निर्णयामुळे गॅसपुरवठा नियंत्रणात ठेवणे तसेच साठेबाजांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. तसेच घरगुती एलपीजी, पीएनजी वाहतुकीसाठी सीएनजीला प्राधान्याने पुरवठा केला जाणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Web Title : चाकन में गैस सिलेंडर की कमी; काला बाजार फलफूल रहा, लंबी कतारें।

Web Summary : चाकन विदेशी संघर्ष के कारण गैस सिलेंडर की कमी का सामना कर रहा है। काला बाजार बढ़ रहा है, घरेलू आपूर्ति बाधित, लंबी कतारें। एस्मा लागू।

Web Title : Gas cylinder shortage in Chakan; black market thrives, long queues emerge.

Web Summary : Chakan faces gas cylinder shortage due to conflict abroad. Black market prices soar, domestic supply disrupted, and long queues form. ESMA enforced.