आळंदी येथे घरात गॅस सिलेंडरचा स्फोट; एक जखमी, कोणतीही जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:56 IST2025-07-28T11:56:32+5:302025-07-28T11:56:56+5:30

सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र एलपीजी गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे

Gas cylinder explodes in house in Alandi; One injured, no casualties | आळंदी येथे घरात गॅस सिलेंडरचा स्फोट; एक जखमी, कोणतीही जीवितहानी नाही

आळंदी येथे घरात गॅस सिलेंडरचा स्फोट; एक जखमी, कोणतीही जीवितहानी नाही

आळंदी : आळंदी देवाची येथे दत्त मंदिर रस्त्यावरील हरिपाठ उद्यान समोर सोमवारी (दि. २८) पहाटे साडेपाचच्या सुमारास एका घराला गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. या दुर्घटनेत एक व्यक्ती जखमी झाला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र एलपीजी गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
            
आळंदीतील लहु विठ्ठल कोकाटे यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष सागर बोरूंदिया यांनी आळंदी अग्निशमन दलास दिली. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे वाहन तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. मात्र, रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या पार्क केलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे वाहन पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्या. तरीही जवानांनी धाडसाने घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचे काम सुरू केले. घरातून दोन एलपीजी सिलेंडर तात्काळ बाहेर काढल्याने संभाव्य मोठा स्फोट टळला. दरम्यान आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने किचनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले.    
            
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी अग्निशमन दलातील लिडिंग फायरमन प्रसाद बोराटे, अमित घुंडरे, सिद्धार्थ गावडे, साहिल काळे, वाहनचालक विनायक सोळंकी आदींनी मोठ्या मेहनतीने आगीवर नियंत्रण मिळविले. घटनास्थळी आळंदी पोलीस ठाण्याचे गोपनीय अधिकारी मच्छिंद्र शेंडे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी मदत कार्यात हातभार लावला.  

Web Title: Gas cylinder explodes in house in Alandi; One injured, no casualties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.